अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानगी केंद्रीय पर्यावरण खात्याकडून मिळाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात सांगितले. या शिवस्मारकाचे भूमिपूजन शासकीय शिवजयंतीदिनी १९ फेब्रुवारीला करण्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते तूर्त पुढे ढकलण्यात आले आहे. शिवस्मारकाच्या निर्मितीसाठी आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्त्वाखाली समितीही नेमण्यात आली आहे. पर्यावरण खात्याकडून सर्व परवानग्या मिळाल्याबद्दल फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभारही मानले आहेत.
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी १५.९६ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. ही जागा राजभवनापासून १.२ किलोमीटर अंतरावर आहे. स्मारकाच्या जागेवर अन्वेषण व सर्वेक्षण करणारी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, निरी, मेरीटाईम बोर्ड व आयआयटी पवई यांनी या पूर्वीच आपले काम सुरू केले आहे.