थर्माकोलच्या ताटल्यांऐवजी पर्यावरणपूरक असलेल्या पत्रावळींचा वापर आता देवस्थानांच्या उत्सवांमध्येही सुरू झाल्याचे दिसून येत आहे. नीरा नरसिंगपूर आणि शंकरमहाराज मठ येथे झालेल्या उत्सवांमध्ये थर्माकोलला फाटा दोऊन पत्रावळींचा वापर करण्यात आला.

‘शाश्वत ईको सोल्युशन्स फाऊंडेशन’ आणि ‘कमिन्स’ यांच्यातर्फे ‘पत्रावळ २०१६’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून, त्यातील हे निरीक्षण आहे. शंकरमहाराज मठातील उत्सवासाठी या प्रकल्पातून ४५ हजार पत्रावळी व २ लाख द्रोण पुरवले गेले, तर नीरा नरसिंगपूर येथील नृसिंह जयंती उत्सवासाठी ३ हजार पत्रावळी व ३ हजार द्रोण पुरवले गेले. विशेष म्हणजे आषाढी वारीसाठी पत्रावळी पुरवण्यासाठी संस्थेस आळंदी देवस्थानच्या व्यवस्थापनाची मान्यताही मिळाली आहे. पंढरपूरच्या देवस्थानच्या व्यवस्थापनाशीही पत्रावळींसंबंधी बोलणी सुरू आहेत, अशी माहिती संस्थेच्या प्रकल्प प्रमुख दीप्ती दीक्षित यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘नागरिकही त्यांच्या घरी खूप पाहुणे येतात तेव्हा किंवा ‘गेट टुगेदर’ला पत्रावळी वापरू शकतील. स्टीलच्या ताटल्या घासायलाही पाणी लागतेच. पत्रावळी आर्थिकदृष्टय़ा परवडण्याजोग्या असून, पर्यावरणपूरकही आहेत. सध्या पुण्यातील एक व मुंबईतील एक व्यावसायिक आम्हाला पत्रावळी पुरवत आहे.

पंधरा रहिवासी संकुलांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची योजनाही (रेन वॉटर हार्वेस्टिंग) संस्थेने राबवली असून, त्याद्वारे ३० लाख लीटर पाणी वाचवण्याची क्षमता निर्माण झाल्याची माहितीही संस्थेतर्फे देण्यात आली. ‘यातील काही इमारतींसाठी ‘कमिन्स’ने अर्थसाहाय्य केले आहे, परंतु त्याशिवायही संस्थेतर्फे सोसायटय़ांमध्ये ही यंत्रणा बसवण्यासाठी सशुल्क मार्गदर्शन केले जाते,’ असेही दीक्षित यांनी सांगितले.