प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र समोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. डीएसके यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह चार बड्या अधिकाऱ्यांना तसेच  डीएसकेंचे सीए आणि अभियंत्यांनाही आर्थिक गुन्हे शाखेने आज (बुधवार) अटक केली आहे. प्रथम त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुंतवणूकदारांचे पैसे आणि बँकांचे कर्ज थकवल्याप्रकरणी डी.एस.कुलकर्णी सध्या कारागृहात आहेत. पुणे आर्थिक गुन्हे शाखेला बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्य कर्ज दिल्याचा संशय आहे. त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी मराठे यांच्यासह काही अधिकाऱ्यांना बोलावले होते. यात आणखी काही अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. मराठे यांच्यासह बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, डीएसकेंचे सीए सुनील घाटपांडे, अभियंता राजीव नवासकर यांना पुण्याहून तर बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष सुशील मुनहोत यांना जयपूर तर अहमदाबाद येथे बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले नित्यानंद देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर  करत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज मंजूर केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eow police arrested the chairman of bank of maharashtra and other official for dsk matter
First published on: 20-06-2018 at 13:17 IST