राज्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचे समन्यायी वाटप करावे लागेल,अन्यथा पाणीवाटपावरून ज्या प्रमाणे आंतरराज्य वाद निर्माण होत आहेत त्या प्रमाणे पाणीवाटपावरून आंतरजिल्हा वाद राज्यात उत्पन्न होतील. हा धोका ओळखून राजकीय हस्तक्षेप न करता राज्यात समन्यायी वाटप झाले पाहिजे, अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केली. जलयुक्त शिवारमध्ये आधीच ‘पाणी मुरले’ आहे, असाही आरोप त्यांनी केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे चव्हाण यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते. राज्यातील कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेत असल्याचे सांगून चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राचा दुष्काळ दूर व्हावा हीच आता प्रार्थना आहे. दुष्काळाचा मोठा फटका मराठवाडय़ाला बसला आहे. नुकत्याच पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला असला तरी पिकांचे उत्पन्न येणार नाही. यासाठी रब्बीचे नियोजन करताना सरकारने योग्य पावले उचलावीत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी आणि व्याजमाफी द्यावी, ही आमची मागणी कायम आहे.
राज्यात राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनाबाबत चव्हाण यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पहिले आंदोलन काँग्रेसनेच केले. विधिमंडळाचे कामकाजही आम्ही रोखून धरले होते. मात्र सरकारने प्रतिसाद दिला नाही, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राष्ट्रवादीने कोणती आंदोलने करावीत हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मला त्याबाबत भाष्य करायचे नाही.
जलयुक्त शिवार योजनेचे ई टेंडरिंग सरकारने केलेले नाही. ई टेंडरिंग न करताच या योजनेत कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे या योजनेत आधीच ‘पाणी मुरले’ आहे, असाही आरोप चव्हाण यांनी केला. गुंतवणुकीमध्ये राज्य आठव्या क्रमांकावर आहे. पूर्वी राज्यात गुंतवणूक येत होती. गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक का होत आहे याचे आत्मपरीक्षण शासनाने करावे. विदेशवाऱ्या झाल्या असल्या तरी राज्यात गुंतवणूक आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
वैचारिक स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी हत्येचे पाऊल उचलणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालणे आवश्यक आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. एमआयएमची भीती वाटत नाही. कारण पूर्वी मुस्लिम लीगही अशाच प्रकारे काम करत होती. मात्र एमआयएमचा वापर बिहारमध्ये भाजप करत आहे, असा माझा आरोप आहे. अपप्रचार आणि मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण होणार नाही याचे नियोजन करावे लागेल असेही ते म्हणाले. संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर आणि सरचिटणीस योगिराज प्रभुणे या वेळी उपस्थित होते.