‘इतिहास हा वारसा असल्यामुळे त्याचा विपर्यास होणे योग्य नाही. ऐतिहासिक घटना खऱ्याच दाखवल्या गेल्या पाहिजेत. मूळ विषयच बदलून टाकणे चुकीचे आहे. या मुद्दय़ावर बहुतेक ऐतिहासिक चित्रपट अयोग्य ठरतात,’ असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी व्यक्त केले.
‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ‘सेन्सॉरशिप’ या विषयावर रवी गुप्ता यांनी बेनेगल आणि जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोळकर यांच्याशी संवाद साधला. या वेळी प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना बेनेगल बोलत होते. ते म्हणाले, ‘ऐतिहासिक घटना उघड असतात, त्यांचा अर्थ लावण्याबाबत दुमत असू शकते. ऐतिहासिक चित्रपटात ऐतिहासिक घटना खऱ्याच असायला हव्यात.’ याबाबत बेनेगल यांनी त्यांच्या ‘भारत एक खोज’ या मालिकेचे, तसेच ‘बोस- द फरगॉटन हीरो’ या चित्रपटाचे उदाहरण दिले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला की नाही याबाबत अनेक मते व्यक्त केली जात असली तरी बोस कुटुंबीयांनी जी माहिती खरी मानली आहे ती पायाभूत मानल्याचे ते म्हणाले.
चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या मुद्दय़ावर बेनेगल म्हणाले, ‘चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे काम चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचे असून चित्रपटांवर बंधने घालण्याचे नव्हे. सरकारने नेमलेली नवी समिती मंडळाच्या कार्यपद्धतीत असलेल्या उणिवा दूर करण्यासाठी आहे. ही समिती सर्व गोष्टींचा विचार करून दोन महिन्यांत आपला अहवाल सादर करेल. प्रेक्षकांना काय दाखवायचे हे कोणत्या पायावर ठरवावे हे महत्वाचे आहे. देशाच्या संविधानाचे निकष त्यासाठी लावायला हवेत.’