भल्या पहाटेच पुण्यातील कोथरूड, बावधनमध्ये गव्याचे झालेले आगमन, सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळ्यात बिबटय़ाकडून झालेले हल्ले या घटनाच नुकत्याच घडल्या. अशा घटनांमध्ये मानवी वस्तीत अचानक शिरणाऱ्या वन्यप्राण्यांमधील संघर्षांतून उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी वनविभागाच्या पुणे कार्यालयाकडून शीघ्र प्रतिसाद दलाची (रॅपिड रिस्पॉन्स फोर्स) स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार राज्यात पहिल्यांदाच वनविभागाकडून शीघ्र प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली आहे.

पुण्यातील कोथरूड भागात गेल्या वर्षी नऊ डिसेंबर रोजी गवा शिरला होता. त्यानंतर बावधन भागात २१ डिसेंबर रोजी गवा शिरला होता. करमाळ्यात बिबटय़ाने घातलेल्या धुमाकुळामुळे तेथील नागरिक भयभीत झाले होते. मानवी वस्तीत बिबटय़ा शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. पुणे जिल्ह्य़ासह राज्याच्या वेगवेगळ्या भागात बिबटय़ाने मानवी वस्तीत शिरकाव केल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशा परिस्थितीत वनविभागाच्या पुणे कार्यालयाकडून शीघ्र प्रतिसाद दल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या पुणे कार्यालयातील उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

मानवी वस्तीत वन्यप्राणी शिरल्यास त्वरित त्याची सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी या दलाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. वनविभागातील १२ अधिकारी, कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच रेक्यू व्हॅन, वॉकी टॉकी, संरक्षक कपडे तसेच अन्य साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

शीघ्र प्रतिसाद दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल, सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार, भूगाव येथील ‘रेस्क्यू’ संस्थेच्या नेहा पंचमिया आणि सहकारी उपस्थित होते.

वन्यप्राणी बुजरे असतात. नैसर्गिक अधिवासातून त्यांनी मानवी वस्तीत शिरकाव केल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी होती. बघ्यांची गर्दी तातडीने हटवून त्वरित मदत कार्य सुरू करण्यासाठी शीघ्र प्रतिसाद दलातील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे, तसेच वनविभागाकडून २४ हेल्पलाइन क्रमांक देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पथकातील कर्मचाऱ्यांना ट्रँक्विलायजिंग गन (प्राण्यांना भुलीचे इंजेक्शन देण्यासाठी बंदूक), बचाव पिंजरे, रेस्क्यू व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

– राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे विभाग