विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे ‘टेक्नोलॉजी इनोव्हेशन हब’ची स्थापना

पुणे : उदयोन्मुख क्वांटम तंत्रज्ञानावरील संशोधन करण्याची संधी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेला (आयसर पुणे) मिळाली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (डीएसटी) आणि आयसर पुणे यांच्यातर्फे क्वांटम टेक्नॉलॉजीच्या संशोधनासाठी  आधारित ‘टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब’ची निर्मिती करण्यात आली असून, त्या द्वारे क्वांटम संगणक, क्वांटम जनसंज्ञापन उपकरण आणि प्रणाली, सेन्सर्स विकसित करण्यात येणार आहेत.

आयसर पुणेमध्ये टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब अंतर्गत आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशन असे नाव असलेली स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली आहे.  क्वांटम तंत्रज्ञानाद्वारे प्रचलित संगणकीय प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. त्या द्वारे संगणकीय गणिती प्रक्रिया अधिक वेगवान होऊ शकतील. तसेच अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ निर्माण करता येणार आहे. सेन्सर्सद्वारे जनसंज्ञापन उपकरणे, प्रणाली विकसित होतील. या बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे अमर्याद नव्या संधी प्राप्त होतील. विशेषत: आरोग्य निगा, सुरक्षित जनसंज्ञापन, वाहतूक, नैसर्गिक स्रोतांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करणे शक्य होईल.

टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हबद्वारे नवउद्यमी कंपन्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्यासाठीची कौशल्य विकसित करण्यासाठी कार्यशाळा, अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. अद्ययावत संशोधनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करून देशभरातील संशोधन संस्थांना दिल्या जातील.

आयसर पुणेतील १३ संशोधन गट ‘क्वांटम टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब’अंतर्गत संशोधन करणार आहेत. तसेच देशा-विदेशातील २० संशोधन संस्था, विद्यापीठांशी सहकार्याद्वारे संशोधन करण्यात येईल. या केंद्रासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने १७० कोटींचा निधी पाच वर्षांसाठी उप लब्ध करून दिला आहे. क्वांटम तंत्रज्ञानातील अत्याधुनिक आणि अद्ययावत संशोधनाद्वारे पुढील काही दशकांत क्रांतिकारक बदल होतील. देशात हे तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी आयसर पुणेला मिळाली, याचा विशेष आनंद आहे. – डॉ. जयंत उदगावकर, संचालक, आयसर पुणे