विद्यापीठांच्या संशोधनाची गुणवत्ता, त्याचा जागतिक स्तरावरील दर्जा यांचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्रीय स्तरावर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक समिती स्थापन केली असून जागतिक क्रमवारीमध्ये भारतीय विद्यापीठांचा स्तर सुधारावा, या उद्देशाने ही समिती काम करणार आहे.
भारतीय विद्यापीठांची जागतिक स्तरावरील क्रमवारीत पीछेहाट होत आहे. या पाश्र्वभूमीवर विद्यापीठांच्या पातळीवरील संशोधने, त्याचा दर्जा, त्यासाठी येणाऱ्या विविध अडचणी अशा मुद्दय़ांचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय स्तरावरील समिती स्थापन करण्यात आली आहे. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे सचिव डॉ. के. विजय राघवन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरूण निगवेकर, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. आर. नटराजन, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे माजी  संचालक डॉ. एस. शिवराम यांच्यासह देशातील शिक्षणतज्ज्ञ, विविध विद्यापीठांचे कुलगुरू अशा अठरा सदस्यांचा या समितीमध्ये समावेश आहे.
देशातील विविध विद्यापीठे, आघाडीच्या शिक्षणसंस्था यांमध्ये संशोधनाची सद्य:स्थिती काय आहे, संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी अर्थिक तरतूद कशी असावी, पायाभूत सुविधा कशा निर्माण कराव्यात, सध्या विद्यापीठांना संशोधनाबाबत काय अडचणी आहेत अशा विविध मुद्दय़ांचा अहवाल ही समिती सादर करेल. संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी धोरणात्मक आखणीही ही समिती करणार आहे. शिक्षणसंस्थांच्या संशोधनानुसार त्यांची देशातील क्रमवारी जाहीर करण्याबाबतची रुपरेखाही ही समिती देणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये ही समिती मनुष्यबळ मंत्रालयाकडे हा अहवाल सादर करणार आहे.