गेल्या वर्षांत १६६७ वाहनांची चोरी

पुणे : शहरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात शहराच्या वेगवेगळ्या भागातून एक हजार ६६७ वाहनांची चोरी झाली. शहरात चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. पोलिसांकडे दाखल होणाऱ्या तक्रारींचे अवलोकन केले असता शहरातून दररोज सरासरी चार ते पाच दुचाकी चोरीला जात असल्याचे चित्र समोर आले आहे.

दुचाकींचे शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात दुचाकीचोरीचे गुन्हे वाढत आहेत. शहरातील वाहनांची वाढती संख्या मोठी असून रस्त्यावर दुचाकी तसेच चारचाकी वाहने लावण्यासाठी जागेचा शोध घेण्याची कसरत वाहनचालकांना करावी लागते. शहराच्या मध्यभागात रस्त्याच्या कडेला वाहने लावण्यासाठी जागाही मिळत नाही.  वाहन लावले तर ते जागेवर राहील, याची शाश्वती वाहनचालकांना नसते. रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढते आहे.

पुणे शहर परिसरातून दररोज चार ते सहा वाहने चोरीला जात असून गेल्यावर्षी डिसेंबरअखेर पर्यंत शहरातून १६६७ वाहनांची वाहने चोरीला गेली. त्यात दुचाकींचे प्रमाण अधिक आहे. दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याच्या तुलनेत दाखल होणाऱ्या गुन्ह्य़ांची संख्या मोठी आहे.

शहरात जवळपास २८ लाखांहून अधिक दुचाकी वाहने आहेत. दररोज चारशे ते पाचशे दुचाकी वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे होते. शहरात घडणारे दुचाकी चोरींच्या गुन्ह्य़ांचे प्रमाण पाहता पोलिसांकडून केले जाणारे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. चोरटे वाहनांचे हँडल लॉक तोडून दुचाकी लांबवितात, तसेच बनावट चावीचा वापर करून दुचाकी लांबविल्या जातात. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी वाहनचालकांनी चांगल्या दर्जाचे अतिरिक्त कुलूप लावल्यास चोरटय़ांना दुचाकी चोरी करणे शक्य होणार नाही, असे सूचित केले होते.

दुचाकी ताब्यात नाही; पण हप्ते चालू

शहरात दुचाकी वापराचे प्रमाण मोठे आहे. अनेकजण बाहेरगावाहून नोकरी, शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास येतात. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पाहता अनेकांना दुचाकी वापरण्याशिवाय पर्याय नसतो. अनेकजण कर्ज काढून हप्त्यांवर दुचाकी खरेदी करतात. दुचाकी चोरीला जाते; पण पुढे हप्ते भरावेच लागतात. अनेकांनी वाहनाचा विमा उतरविलेला नसतो. त्यामुळे कर्जावर घेतलेली दुचाकी चोरीला गेल्यानंतर आर्थिक नुकसान सोसावे लागते.