राज्यातील प्रत्येक पोलिसाला घर मिळालेच पाहिजे, अशी सरकारी भूमिका असून पोलिसांच्या घरासाठी खूप मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. हुडकोकडून पाचशे कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सोमवारी केले.
पुणे शहर पोलीस दलास गस्त घालण्यासाठी घेण्यात आलेल्या अत्याधुनिक अशा ३६ मोटारी फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल्या.  या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पोलीस आयुक्त सतीश माथूर उपस्थित होते.
नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून चोवीस तास काम करणाऱ्या पोलिसांना घरे मिळालीच पाहिजेत, हा नवीन सरकारचा निर्णय आहे. त्यासाठी खूप मोठय़ा प्रमाणात घरे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, की पोलिसांच्या घरासाठी एफएसआय वाढवून देत तो तीन ते चार देण्यात आला आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात घरे उपलब्ध होतील. या वाढीव एफएसआयचा उपयोग करून, चांगले नियोजन करून अधिक घरे उपलब्ध करून देता येतील. त्यासाठी शासनाकडून निधीसुद्धा उपलब्ध करून देता येतील. प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला घर मिळालेच पाहिजे. त्यासाठी काही महत्त्वाच्या जागा सुद्धा घेण्यात येतील. पोलीस चांगले राहिले, त्यांच्या परिवाराला चांगले वातावरण मिळाले पाहिजे. त्यामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढून कायदा-सुव्यवस्था अधिक चांगली राहील. पोलिसांच्या पाठीशी सरकार नेहमीच राहील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. शहरात टोळीचे राज्य निर्माण न होऊ देता पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तयार राहावे, असे आदेश त्यांनी या वेळी पोलिसांना दिले.
पोलीस आयुक्तालयास येत्या जुलै महिन्यात पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, ही फारच अभिमानाची गोष्ट आहे. या सुवर्णजयंती वर्षांत नवीन प्रशासकीय इमारत व इतर मागण्या निश्चित पूर्ण केल्या जातील. यासाठी पालकमंत्री बापट यांनी लक्ष घालून पाठपुरवा करावा, अशी सूचना देखील फडणवीस यांनी केली.
पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या सुवर्णजयंती वर्षांत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. गोल्डन ज्युबली इमारतीसाठी तेरा कोटींच्या इमारतीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले. तर, शिवाजीनगर मुख्यालयाच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारतीसाठी ४५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पोलिसांच्या घराचा प्रश्न देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला.

‘सुट्टीच्या दिवशी काम केल्यास
पोलिसांना पूर्ण पगार मिळणार’
पोलिसांना कामामुळे साप्ताहिक सुट्टी देखील मिळत नाही. सुट्टी न मिळाल्यामुळे त्या दिवशी इतर दिवसांप्रमाणे त्यांना वाढीव पगार मिळत नव्हता. सुट्टीच्या दिवशी पोलिसांना ६८ रुपये मिळणारे वेतन हे रोजनदारीवर जाणाऱ्या माणसांपेक्षा कमी आहे. त्यामुळे यापुढे पोलिस हे सुट्टीच्या दिवशी कामावर आल्यास इतर दिवसांप्रमाणे त्या दिवशीचे पूर्ण वेतन दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.