वाचन दिनासाठी शिक्षण विभागाला पडले नवे स्वप्न
 ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ करताना शिक्षण विभागाला आता रोज नवे स्वप्न पडू लागले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने एका दिवसांत तब्बल दहा पुस्तकांचे वाचन करावे, असे नवे स्वप्न आता शिक्षण विभाग पाहत आहे. इतकेच नाही तर या स्वप्नपूर्तीसाठी शिक्षकांनी विद्यार्थिसंख्येच्या प्रमाणात लोकांकडे याचना करून पुस्तके गोळा करावीत, असे फर्मानही विभागाने सोडले आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनाला म्हणजे १५ ऑक्टोबरला ‘वाचन प्रेरणा दिवस’ अशी नवी ओळख शिक्षण विभागाने गेल्या वर्षीपासून दिली.
राज्यातील शाळांमध्ये अवांतर वाचन वाढावे यासाठी या दिवशी विविध उपक्रम राबवण्यात यावेत अशी या मागची संकल्पना आहे. या दिवशी वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी तिसरी आणि पुढील वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांने अवघ्या एका दिवसांत तब्बल दहा पुस्तके वाचावीत, अशी अपेक्षा शिक्षण विभागाने त्यांच्या निर्णयातून व्यक्त केली आहे. गेल्या वर्षीपर्यंत पाचवीतील विद्यार्थ्यांला किमान तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेइतके किमान वाचन यावे अशी अपेक्षा शिक्षण विभागाकडून व्यक्त केली जात होती. आता किमान पन्नास पानांचे एक पुस्तक धरले, तरी प्रत्येक विद्यार्थी एका दिवसांत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पाचशे पाने घडाघडा वाचत असल्याचे स्वप्न शिक्षण विभाग पाहत आहे.