उत्क्रांती हा अपघात नाही किंवा योगायोग नाही तर हळूहळू घडणारी ती एक सहज प्रक्रिया आहे, असे मत विज्ञान कथालेखक सुबोध जावडेकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
कराड येथील चौफेर संस्थेतर्फे डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांनी लिहिलेल्या ‘गोफ जन्मांतरीचा’ या पुस्तकावर आयोजित ‘जीवसृष्टीचे कोडे : उत्क्रांतीची उकल आणि आपण’ या विषयावरील चर्चासत्रात सुबोध जावडेकर बोलत होते. यामध्ये ज्येष्ठ अभ्यासक राजीव साने, माजी खासदार प्रदीप रावत सहभागी झाले होते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू अध्यक्षस्थानी होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. अजय ब्रह्मनाळकर याप्रसंगी उपस्थित होते.
सुबोध जावडेकर म्हणाले, ब्रह्मनाळकर यांच्या पुस्तकातून विज्ञानाचा अर्थ आणि तत्त्वज्ञान सुबोधपणे उलगडले आहे. यामध्ये कादंबरीतील विचारगर्भता, कथेतील रंजकता आणि कवितेतील उत्स्फूर्तता यांचा मिलाफ आहे.
प्रदीप रावत म्हणाले, उत्क्रांती हा वाद नाही तर सिद्धांत आहे. उत्क्रांतीमुळे अन्न आणि औषध क्षेत्रातच केवळ वेगाने बदल होणार आहेत असे नाही, तर जीवनविषयक दृष्टिकोनात बदल घडणार आहेत. सामाजिक सुधारणांसाठी विज्ञान हेच हत्यार प्रभावी ठरणार आहे. केवळ भौतिक नव्हे तर, नैतिक जीवन समृद्ध करण्याची ताकद उत्क्रांतीवादामध्ये आहे.
राजीव साने म्हणाले, जनुकांनी मेंदू निर्माण करताना जी चूक केली तीच चूक मेंदूने जाणीव निर्माण करताना केली. माणूस हा हत्यार निर्माण करणारा आणि फळांची निर्मिती करणारा प्राणी आहे. माणसाच्या प्रत्येक कृतीमध्ये विज्ञान आणि कारणमीमांसा महत्त्वाची आहे. डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांनी पुस्तकाच्या अंतरंगाची माहिती दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आभार मानले. डॉ. अजय ब्रह्मनाळकर यांनी सूत्रसंचालन केले.