दिल्लीत पुरस्कार वितरण

केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाकडून उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा पुरस्कार यंदा कोयना धरणाला जाहीर  झाला आहे. या संस्थेमार्फत १९२७ पासून जल आणि विद्युत क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा?ऱ्या विभाग आणि संस्थांना देखील गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दिल्लीत होणार आहे. महाराष्ट्रातून पुणे विभागातील कोयना, भाटघर आणि वीर अशा तीन धरणांची नामांकने मंत्रालयाकडून केंद्र शासनाकडे पाठवण्यात आली होती. त्यातून कोयना धरणाची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील कोयना धरण हे महत्त्वाच्या धरणांपैकी एक मोठे धरण आहे. सह्य़ाद्री पर्वतरांगेत असलेल्या महाबळेश्वर येथून उगम पावणा?ऱ्या कोयना नदीवर सन १९५४ ते १९६४ या कालावधीत हे धरण बांधण्यात आले. धरणाची लांबी ८०७ मीटर आणि उंची १०३ मीटर आहे.  तब्बल १०५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची साठवण क्षमता असलेल्या कोयनाला डिसेंबर १९६७ मध्ये झालेल्या भूकंपामुळे तडे गेले होते. १९६८ मध्ये धरणाला पडलेल्या भेगा ग्राउटिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बुजवण्यात आल्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे धरण पूर्णपणे भूकंपरोधित करण्यात आले आहे. कोयना भूकंपाला ५५ वर्षे झाली असून धरणाच्या बांधकामालाही तेवढीच वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु, धरणाला अद्याप कोणत्याही प्रकारची हानी नाही, असे मजबूत बांधकाम करण्यात आले आहे.

धरणाच्या डागडुजीचे काम वेळोवेळी केले जात आहे. व्यवस्थापन विभागाची सतर्कता आणि देखरेख यामुळेच कोयनाला हा पुरस्कार मिळाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. या धरणातील पाणी जलविद्युत निर्मिती, सिंचनासाठी वापरण्यात येत असून, जलविद्युत प्रकल्पाची विद्युत निर्मिती क्षमता एक हजार ९६० मेगावॅट इतकी आहे. धरणातून होणाऱ्या ऊर्जा निर्मितीमुळे राज्यामध्ये औद्योगिक विकास होण्याला हातभार लागला आहे, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले.