राज्यात मार्च महिन्यात प्लास्टिकबंदी लागू झाली आणि ग्राहक आणि विक्रेते या दोन्ही घटकांसमोर कॅरिबॅगला पर्याय काय, असा प्रश्न लगेच उभा राहिला. कॅरिबॅगवर कारवाई सुरू झाल्यामुळे बाजारातील त्यांचा वापर कमी झाला असला, तरी पर्याय काय हा प्रश्न आहेच. महापालिकेच्या वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने विविध प्रकारातील आणि स्वस्त कापडी पिशव्यांच्या माध्यमातून हा पर्याय उपलब्ध करून दिला असून त्यामुळे कापडी पिशव्यांचा वापर तर वाढला आहेच, शिवाय बचत गटातील महिलांना उत्तम रोजगारही मिळू लागला आहे.

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, कमिन्स इंडिया, जैन सोशल ग्रुप पुणे परिवार, मोहल्ला समिती आणि बचत गट यांच्या सहकार्यातून कापडी पिशव्या निर्मिती आणि विक्री हा उपक्रम यशस्वी रीत्या राबवला जात आहे. या कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे बचत गटांमधील चाळीत ते पन्नास महिलांना रोजगाराचे उत्तम साधन मिळाले आहे. प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीनंतर काही तरी पर्याय दिला पाहिजे या विचाराने ढेलवान यांनी बचत गटांकडून कापडी पिशव्या तयार करून घेण्याचा उपक्रम आखला आणि तो उत्तम रीतीने सुरू आहे.

या उपक्रमात नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आणि ना नफा ना तोटा या तत्त्वावरील कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्या जातात. पिशवीच्या आकार-प्रकारानुसार तीन पिशव्यांची किंमत बारा, पंधरा आणि पंचवीस रुपये अशी ठेवण्यात आली आहे. वारजे जकात नाका, कर्वेनगर, कोथरूड, उत्तमनगर, हंडेवाडी, उंड्री आणि गणेशनगर येथील बचतगटांमधील महिला पिशव्या शिवण्याचे काम करतात. त्यांना कापड आणि दोरा क्षेत्रीय कार्यालयाकडून पुरवला जातो. त्यांच्याकडून तयार होणाऱ्या पिशव्यांची विक्री नागरिकांना केली जाते.

मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून जागृती कणेकर, पूनम चोरडिया, रूपाली मगर, मेघना काळे यांचेही कापडी पिशव्यांच्या प्रचाराचे काम बैठकांच्या माध्यमातून सुरू असून लवकरच प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन पिशव्यांची विक्री करण्याची योजना आहे. जैन सोशल ग्रुपचे विजय शहा यांनी तसेच सुरेश शर्मा, प्रसाद दातार, इंद्रजित मेहेंदळे, मेघना काळे, राजीव शहा, रणजित शहा, गोपाळ शर्मा तसेच कमिन्स इंडियाच्या अधिकाऱ्यांचेही या उपक्रमात महत्त्वपूर्ण साहाय्य झाले आहे.

उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून पुढच्या टप्प्यात फळविक्रेते, भाजीविक्रेते, किराणा मालाचे दुकानदार यांनाही आम्ही या पिशव्या पुरवणार आहोत. या पिशव्या पाहून काही मोठे दुकानदार तसेच मॉलचालकांनीही पिशव्या देण्याची मागणी केली असल्याचे ढेलवान यांनी सांगितले. या कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक राहुल शेळके, किरण गुरव, फकीर शेख, सुहास पांढरे, ऋतुराज दीक्षित तसेच सुनील मोरे हे सर्व जण त्यांच्या भागात कापडी पिशव्यांचा वापर वाढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. महापालिकेचे सह आयुक्त सुनील केसरी आणि सहायक आयुक्त गणेश सोनुने यांनीही उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या प्रचारासाठी आवश्यक साहाय्य केले असून नगरसेवकांकडूनही कापडी पिशव्यांच्या वाटपाचे कार्यक्रम केले जात आहेत. या उपक्रमाला सर्व भागांमधून तसेच सोसायटय़ांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून लवकरच त्याची व्याप्ती वाढवली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.