विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि शासनाच्या निर्देशानुसार पदवी-पदव्युत्तरचे अंतिम वर्ष वगळता अन्य वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या.  विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी परीक्षा मंडळाची बैठक झाली. त्यात अंतिम वगळता इतर वर्षांचे निकाल महाविद्यालय स्तरावर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार आता महाविद्यालय स्तरावर या संदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा मार्चमध्ये सुरू झाल्या होत्या. त्यात प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या काही विषयांच्या परीक्षा झाल्या आहेत. परीक्षा झालेल्या विषयांच्या उत्तरपत्रिका केंद्रीय मूल्यमापन प्रक्रियेत जमा झाल्या. मात्र उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झालेली नाही.  उत्तरपत्रिका महाविद्यालयात परत पाठवून प्राध्यापकांकडून तपासून घ्याव्या लागतील.  लाल श्रेणीतील परिसरात असलेल्या महाविद्यालयांबाबत  आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल.

परीक्षा होणार नसलेल्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन, निकाल तयार करण्याची प्रक्रिया महाविद्यालय स्तरावर पूर्ण करण्यात येईल. त्याचा विदा महाविद्यालये विद्यापीठाकडे पाठवतील. त्यानंतर विद्यापीठाकडून निकाल जाहीर करण्यात येईल.

– डॉ. एन. एस. उमराणी, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ