सातत्याने बराच वेळ मोबाइलवरून बोलणे, वॉट्स अॅपवरून चॅटिंग आणि त्यातून निर्माण होणारा विसंवाद आणि वाढणारा संशय हे पती-पत्नीमधील कौटुंबिक वादाचे महत्त्वाचे कारण ठरत आहे. कौटुंबिक न्यायालय आणि महिला तक्रार निवारण कक्षाकडे आलेल्या तक्रारी आणि दावे यावरून ही गोष्ट समोर आली आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या एकूण दाव्यांपैकी चाळीस टक्के वादाचे कारण मोबाइल असल्याचे आढळून आले आहे.
मोबाइल ही प्रत्येकाची गरज झाली आहे. उच्चभ्रूंपासून अगदी सामान्य माणसांच्या हातात मोबाइल आला आहे. एखाद्या दिवशी मोबाइल घरी विसरला की व्यक्ती अस्वस्थ होतो. आता स्मार्ट फोनचा व इंटरनेटचा जमाना आला आहे. त्यामुळे मोबाइलवरून संभाषणाबरोबरच वॉट्स अॅप चॅटिंग ही सर्रास गोष्ट झाली आहे. पण, हाच मोबाइल आता पती-पत्नीच्या वादाचे मोठे करण ठरू लागला आहे. केवळ उच्च शिक्षित किंवा मध्यमवर्गीय दाम्पत्यांमध्येच नव्हे, तर अशिक्षित वर्गातील पती-पत्नीमधील वादातही मोबाइल कारणीभूत ठरत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. पती-पत्नीमध्ये किरकोळ स्वरूपाचे वाद झाल्यानंतर ते दोघांमध्येच मिटणे आवश्यक असते. पण, किरकोळ व खासगी गोष्टी देखील मुलीच्या माहेरी मोबाइलवरून लगेच समजतात. त्यामुळे लगेचच जावयाला फोन करून विचारणा केली जाते. हेव्यादाव्यातून पुन्हा त्यांच्यात वाद होतात. त्यामुळे आशा दाव्यात समुपदेश ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
याबाबत कौटुंबिक दाव्यांमध्ये काम करणाऱ्या वकील सुप्रिया कोठारी यांनी सांगितले, की कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या चाळीस टक्क्य़ांत दाव्यात मोबाइल हे वादाचे कारण असल्याचे दिसून आले आहे. मोबाइलमुळे लोक लवकर जवळ येतात. त्यामुळे नको त्या गोष्टी घडत असतात. पती किंवा पत्नीचे बराच वेळ दुसऱ्याशी फोनवर बोलणे. रात्री उशिरापर्यंत वॉट्स अॅपवरून चॅटिंग करणे. या गोष्टींतून दोघांमध्ये विसंवाद वाढत जातो. संशय निर्माण झाल्यामुळे एकमेकांचे मॅसेज, चॅटिंग पाहिले जाते. अशी विविध कारणे पती-पत्नीच्या वादाची आढळून आली आहेत. घटस्फोट घेणे ही पूर्वी भीती वाटण्याची गोष्ट होती. पण आता ही सहज गोष्ट मानली जाते. त्यामुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण ही वाढले आहे.

वॉट्स अॅप ग्रुप’मुळे कौटुंबिक वादात भर
वॉट्स अॅप वापरणाऱ्या व्यक्ती वॉट्स अॅप ग्रुपमध्ये सहभागी नसणे ही गोष्ट दुरापास्त आहे. वॉट्स अॅप ग्रुपमधून शाळेतील किंवा महाविद्यालयातील मित्र भेटतात. चॅटिंगवरून पुन्हा जवळ येतात. त्यांच्यात चर्चा वाढत जाते. कधी-कधी चॅटिंगमध्ये स्वत:चे फोटो पाठविण्याचे प्रकार घडतात. हा प्रकार कधी ना कधी समोर आल्याशिवाय राहत नाही. त्यातून पती-पत्नीमध्ये वाद होतात आणि हे वाद न्यायालयापर्यंत आल्याची काही उदाहरणे आहेत, असे अॅड. सुप्रिया कोठारी यांनी सांगितले. पती किंवा पत्नी गुपचूप कोणाशी तरी चॅटिंग करते, याचा संशय आल्यानंतर मोबाइलची तपासणी होते व काही आक्षेपार्ह सापडल्यास वाद वाढत जातात. अशा प्रकारचे विविध दावे सध्या न्यायालयात सुरू आहेत.