शवागारातील मृतदेहांची अदलाबदल होऊन वेगळ्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्याचा प्रकार रविवारी पुण्यात घडला. बिबवेवाडीच्या राव हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या घटनेत दुरून अंत्यदर्शनासाठी आलेल्या मुलांना आपल्या वडिलांचे अंत्यदर्शन घेण्याची संधीच मिळाली नाही.
बिबवेवाडी येथील सह्य़ाद्री रुग्णालयात उपचार घेणारे रमेशचंद्र वेद यांचा १ जानेवारीला मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा अमेरिकेत तर मुलगी दिल्लीमध्ये वास्तव्यास असल्यामुळे त्यांना वडिलांचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी वेद यांचा मृतदेह राव हॉस्पटलमधील शवागारात ठेवला होता. राव हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे श्रीराम गंधे यांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला व त्यांचाही मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. रविवारी सकाळी गंधे यांच्या कुटुंबीयांनी वेद यांचा मृतदेह घरी नेला व साडेदहाच्या सुमारास या मृतदेहावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. या दरम्यान वेद यांचे कुटुंब त्यांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णालयात आले, तेव्हा मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे उघड झाले. यानंतर रुग्णालयाने गंधे कुटुंबीयांशी संपर्क साधून व्हॉटस्अॅपवर त्यांना रुग्णालयात असलेल्या मृतदेहाचा फोटो पाठवला तेव्हा गंधे कुटुंबीयांना धक्काच बसला, तर वेद कुटुंबीयांपैकी बाहेरून अंत्यदर्शनासाठी आलेल्या मुलांना अंत्यदर्शन घेता आले नाही.
‘प्रथम मृतदेह घेऊन गेलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून ओळख पटवताना चूक झाली असून अंत्यसंस्कारांच्या वेळीही मृतदेह आपल्या नातेवाईकाचा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले नव्हते,’ असे डॉ. एन. पी. राव यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही.