राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दारु पेटवून दिल्याचा आरोप खोटा आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. झालेला प्रकार खूपच दुर्दैवी आहे.  याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त संजीव मुखर्जी यांनी दिली. तसेच, अवैध दारु धंद्याच्या विरोधातील आमची कारवाई थांबणार नाही. त्याचबरोबर, आमच्या अधिकाऱ्यांचे मनोबल कमी होऊ देणार नसल्याचे मुखर्जी यांनी स्पष्ट केले.
पिंपरी येथील भाटनगर भागात सुरु असलेल्या अवैध दारुच्या धंद्यावर छापा टाकण्यासाठी लागलेल्या आगीत उत्पादन शुल्क विभागाचे चार कर्मचारी आणि दोन रहिवासी भाजून जखमी झाले होते. या ठिकाणाची मुखर्जी, उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त सुनील चव्हाण यांनी पाहाणी केली. त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तालयात येऊन सहपोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल यांची भेट घेऊन चर्चा केली. मुखर्जी म्हणाले की, भाटनगर येथे छापा टाकण्यासाठी गेल्यानंतर लागलेल्या आगीत उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी पोपट ढुबे हे ९२ टक्के भाजले आहेत, तर, पंच शिवाजी चव्हाण हे चाळीस टक्के भाजले असून दोघांवर उपचार सुरु आहेत. त्यांची व कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच, या घटनेत जखमी झालेल्या दोन महिलांची ससून रुग्णालयात जाऊन भेट घेतली. ढुबे यांचा जबाब घेण्यात आला आहे. दारुचे कॅन ठेवलेली खोली अत्यंत लहान होती. त्यामध्ये अनेक कॅन होते. एका कॅनची क्षमता साधारण ३५ लिटर आहे. उत्पादन शुल्क विभागाची ही पहिली कारवाई नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी भट्टी पेटवून दिल्याचा आरोप खोटा आहे. तरीही पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. आमच्याकडून अवैध दारु धंद्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, झालेली घटना ही फारच दुर्दैवी आहे. उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात साडेचार हजार कोटीवरून साडेदहा हजार कोटीवर महसूल मिळवून दिला आहे. अवैध दारुच्या धंद्यावरील कारवाई थांबू देणार नाही. दारुच्या धंद्यावर कारवाई करतानाची परिस्थिती कशी हाताळायची यासाठी मुंबईप्रमाणे आता पुण्यातही कॅमेऱ्याद्वारे कारवाईचे चित्रीकरण केले जाईल, असे मुखर्जी यांनी सांगितले. सहपोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी सांगितले की, आगीच्या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरु आहे.

पिंपरी येथील भाटनगर भागात सुरु असलेल्या अवैध दारुच्या धंद्यावर छापा टाकताना लागलेल्या आगीत प्रकरणी तिघांच्या विरुद्ध पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उत्पानद शुल्क विभागाचे उपनिरीक्षक अशोक शितोळे (वय ४२, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. अवैधरित्या स्पिरीटचा साठा करुण ठेवल्याप्रकरणी जालिंदर भास्कर करे (वय ३०, रा. काळेवाडी), घरमालक जगनाथ ग्यानबा सुर्यवंशी (वय ४२, रा. निराधानगर, पिंपरी) आणि काडी पेटवून आग लावण्यास कारणीभूत ठरणारी अज्ञात व्यक्ती अशा तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.