कामासाठी वणवण करणाऱ्या पालकांबरोबर एका ठिकाणाहून दुसरीकडे भटकणाऱ्या चिमुकल्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षण देणारी ‘डोअर स्टेप स्कूल’, रस्त्यावर अक्षरश: मरणासन्न अवस्थेत राहणाऱ्यांना परत माणसात आणू पाहणारी ‘जीवन आनंद संस्था’, नैसर्गिक पद्धतीने मधुमक्षिका पालन व्हावे यासाठी प्रयत्न करणारा ‘सहयोग परिवार’, थरथरत्या हातांना मैत्रीची साथ देणारे ‘पार्किन्सन्स मित्रमंडळ’ अशा तब्बल तीस स्वयंसेवी संस्थांचे कार्य ‘देणे समाजाचे’ या प्रदर्शनातून प्रकाशात आले आहे.
‘आर्टिस्ट्री’ या संस्थेने या प्रदर्शनाचे आयोजन केले असून १४ सप्टेंबपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ९ या वेळात ते कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे सुरू राहणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते शुक्रवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ‘किलरेस्कर ऑईल इंजिन्स’चे कार्यकारी संचालक राजेंद्र देशपांडे, ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये, ‘आर्टिस्ट्री’च्या संचालक वीणा गोखले, चंद्रसेन शिरोळे या वेळी उपस्थित होते.
मुलींच्या पालकांचा ‘सहसंवेदना’ हा मैत्री गट, ऊसतोडणी कामगार आणि इतर स्थलांतरित कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारी ‘शांतिवन’ ही संस्था, संकटग्रस्त व अत्याचारित महिलांना समुपदेश आणि कायदेशीर सल्लाही पुरवणारी ‘स्नेहाधार’ ही संस्था, दत्तक मुलामुलींची लग्ने जुळवण्यासाठीचे ‘मॅट्रिमोनी फॉर अॅडॉप्टेड’ हे संकेतस्थळ, सेंद्रिय शेती आणि देशी गाईंचे वाण यांचा प्रचार करणारी ‘ब्रह्मांड’ ही संस्था अशा विविध उपक्रमांची ओळख या प्रदर्शनात नागरिकांना करून घेता येणार आहे.