खाद्यपदार्थाच्या भाऊगर्दीत सध्या नानाविध पदार्थाचा आस्वाद खवय्ये घेऊ शकत असले, तरी काय खाल आणि कसे खाल हे सांगण्याची गरज आजही कायम आहे. त्यासाठीच एका आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन गुरुवारी (२७ मार्च) करण्यात आले असून विविध खाद्यपदार्थाचे साडेसातशे नमुने या प्रदर्शनात पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
‘खाद्यपदार्थविषयक सर्व काही’ असे स्वरूप असलेल्या या प्रदर्शनाचे आयोजन वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. भव्य अन्नकोट हेही या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ ठरणार आहे. नित्य वापरातील धान्य तसेच अपरिचित परंतु खाद्य म्हणून उपयुक्त अशी धान्य, सर्व प्रकारचा सुकामेवा, सर्व प्रकारच्या डाळी, फळे, सर्व पालेभाज्या, फळभाज्या, चटपटीत पदार्थ यासह अनेक वैविध्यपूर्ण पाककृती आणि त्यांचे नमुने प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. खाद्यपदार्थाविषयी तसेच त्यांचा उपयोग, काय खाल, कसे खाल यांची समग्र माहिती प्रदर्शनात पाहता येईल. या सर्वाची उपयुक्तताही समजावून दिली जाणार आहे.
खाण्यासाठी खूप खर्च केला, महाग दराने खरेदी केली म्हणजे चांगले खाल्ले असे नसते. तर चांगले खाणे म्हणजे काय आणि चांगले कसे खावे याची माहिती या प्रदर्शनातून दिली जाणार आहे. वैद्य प. य. खडीवाले यांनी पाककृती या विषयावर लिहिलेल्या नैवेद्यम् या पुस्तकाच्या तिसऱ्या व चौथ्या भागाचे प्रकाशनही या वेळी होणार आहे. संस्थेच्या मुख्यालयात (२५० शनिवार पेठ, भिवरा लॉजसमोरचा रस्ता) सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले राहणार आहे.