News Flash

केवळ महिलांसाठी ‘पुणे लेडिज बर्डर्स’ व्यासपीठ

७ ते ७३ वर्षे वयोगटातील महिलांच्या छायाचित्रांचे आजपासून प्रदर्शन

७ ते ७३ वर्षे वयोगटातील महिलांच्या छायाचित्रांचे आजपासून प्रदर्शन

पुणे : केवळ महिलांसाठी महिलांनी निर्माण केलेल्या ‘पुणे लेडिज बर्डर्स’ या व्यासपीठाद्वारे विविध वयोगटातील वन्यजीव आणि निसर्ग छायाचित्रकार महिला एकत्र आल्या आहेत. समाज माध्यमाद्वारे एकत्र आलेल्या या महिलांतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारपासून (८ मार्च) ‘इलाक्षी’ हे पहिले आणि वैशिष्टय़पूर्ण छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येत असून या प्रदर्शनात ७ वर्षांची चिमुरडी ते ७३ वर्षांच्या मनाने तरुण असलेल्या ज्येष्ठ महिलेसह ५० महिलांनी टिपलेली पक्षी, वन्यप्राणी, निसर्गचित्र आणि पुष्पसंपदा या विषयावरील छायाचित्रे पुणेकरांना पाहता येतील.

पक्षिप्रेमी प्रीती सोनजे यांच्या कल्पनेतून हौशी आणि उत्साही वन्यजीव व निसर्ग छायाचित्रकार महिलांचा ‘पुणे लेडिज बर्डर्स’ हा समूह साकार झाला. त्यासाठी त्यांनी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ समूह तयार केला. मनात कल्पना आल्यापासून ते आजपर्यंतच्या प्रवासात प्रत्येक गोष्टीत वैजयंती गाडगीळ आणि जया राणे यांचा भक्कम पाठिंबा तसेच मोलाचे साहाय्य त्यांना लाभले.

हा समूह साकार करताना वन्यजीव सहलींचे आयोजक होणे हा हेतू कधीच नव्हता. तर,या क्षेत्रात काही करण्याची इच्छा असलेल्या महिलांना संघटित करून साहाय्य करता यावे हाच हेतू होता, असे प्रीती सोनजे यांनी सांगितले. अनेक हौशी छायाचित्रकार महिलांना पक्षी कुठे दिसू शकतील याची माहिती नसते आणि माहिती मिळाली तरी तिथपर्यंत पोहोचायचे कसे हा प्रश्न असतो, असे लक्षात आले. हे प्रश्न सोडवण्यासाठीच ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ असा विचार करून या समुहाची स्थापना करण्यात आली.

छोटे छोटे गट करावे, गाडी ठरवावी आणि खर्च वाटून घ्यावा या तत्त्वावर गटांच्या  सहली ठरवल्या जातात. वर्षभरात भिगवण, सिंहगड बर्ड व्हॅली, सासवड, वेल्हे, अक्षी, माणगाव, दांडेली, शिरवळ, अबलोली आणि इतरही पक्षिवासांना या गटांनी भेटी दिल्या आहेत. पुणे शहराच्या आसपास तसेच शहरातही अनेक ठिकाणी पक्षी निरीक्षण आणि छायाचित्रण करता येते. प्रत्येक छोटय़ा मोठय़ा सहलीत पक्ष्यांना त्रास होणार नाही किंवा नुकसान पोचणार नाही, तसेच पर्यावरणाचे रक्षण-संवर्धन होईल याची खबरदारी घेतली जाते. तसेच अनुभवी पक्षिप्रेमी आणि छायाचित्रकार नवीन मैत्रीणींना लागेल ती मदत व मार्गदर्शन करतात, असे सोनजे यांनी सांगितले.

केवळ छायाचित्र टिपण्याचा आनंद लुटण्यापेक्षा सर्वाना पक्षी निरीक्षणाची सवय लागावी आणि त्यातून आनंदही घेता यावा यासाठी पक्ष्यांचे राहणीमान, सवयी, पक्षी ओळखण्याच्या खुणा अशा विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आयोजिली जातात. पक्षी, वन्यजीवप्रेमी अशा शंभरहून अधिक महिलांचा समावेश या समुहात आहे.

प्रदर्शन, तज्ज्ञांची व्याख्याने

‘पुणे लेडिज बर्डर्स’तर्फे घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कला दालन येथे भरविण्यात येणाऱ्या ‘इलाक्षी’ प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी प्रसिद्ध छायाचित्रकार जैनी मॉरिया कुरिअ‍ॅकोसे यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. प्रदर्शनाच्या कालावधीत तीन दिवस वन्यजीव आणि निसर्ग संवर्धन विषयातील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. मंगळवापर्यंत (१० मार्च) सकाळी साडेदहा ते रात्री साडेआठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2020 6:43 am

Web Title: exhibition of photographs of women in the age group between 3 to 73 years zws 70
Next Stories
1 पराभव विसरून पुन्हा नव्या दमाने वाटचाल!
2 निवृत्त हवाई दल अधिकाऱ्याची सायबर चोरटय़ांकडून फसवणूक
3 शहरात तापमानातील चढ-उतार कायम
Just Now!
X