मराठी संगीत रंगभूमी आणि चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते गंधर्वभूषण जयराम शिलेदार यांच्या जन्मशताब्दीवर्षांनिमित्त त्यांच्या सहा दशकांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे ‘मर्मबंधातली ठेव’ हे छायाचित्र प्रदर्शन २८ मेपासून दोन दिवस भरविण्यात येणार आहे.
घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालन येथे २८ मे रोजी व्ही. शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते रामदास कामत यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
दोन दिवस सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे.
या प्रदर्शनामध्ये जयराम शिलेदार यांच्या नाटक आणि चित्रपटातील विविध प्रसंगांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार, हंसा वाडकर, सुमती गुप्ते, राम मराठे, छोटा गंधर्व, श्रीपाद नेवरेकर, मा. दत्ताराम, विवेक, ग. दि. माडगूळकर, मा. परशराम, बाबा वैशंपायन, विश्वनाथ बागूल आणि अशोक सराफ या कलाकारांची संगीत नाटकांतील दुर्मिळ छायाचित्रे पाहावयास मिळणार आहेत, असे मराठी रंगभूमी संस्थेच्या कीर्ती शिलेदार आणि दीप्ती भोगले यांनी कळविले आहे.