सायकलला मोटार जोडून बनवलेल्या आद्य मोटारसायकलपासून एकाहून एक रुबाबदार आणि तितक्याच अवजड मोटारसायकलींनी गाजवलेला जुना काळ पुणेकरांसमोर पुन्हा उलगडणार आहे. ‘विंटेज मोटासायकल क्लब’तर्फे केवळ जुन्या मोटारसायकलींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून पुण्यासह मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादच्या बाईकवेडय़ांनी जीवापाड जपलेल्या या मोटारसायकली या वेळी बघता येतील.
‘ट्रायम्फ’, ‘नॉर्टन’, ‘इंडियन चीफ’, ‘बीएसए’ आणि कितीतरी! नुसत्या एका झलकेने भल्याभल्यांच्या नजरा खेचून घेणाऱ्या या मोटारसायकली. अशा दोनशेहून अधिक जुन्या मोटारसायकली एकत्रितपणे बघण्याची आणि या मोटारसायकलींच्या मालकांशी बोलून प्रत्येक जुन्या मोटारसायकलीमागची गोष्ट जाणून घ्यायची संधी पुणेकरांना मिळणार आहे. क्लबचे अध्यक्ष मंदार फडके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नितीन पुरोहित, रुबिन सोलोमन, गार्डियन कॉर्पोरेशनच्या मुख्य विपणन अधिकारी काजल मलिक आदी या वेळी उपस्थित होते. २३ व २४ मे रोजी अॅमेनोरा टाऊन येथे सकाळी ११.३० पासून हा कार्यक्रम होईल.
फडके म्हणाले, ‘‘जुन्या मोटारसायकलींची अवस्था काय आहे यावरून ती पुन्हा पूर्वीसारखी सुरू करण्यासाठी किती श्रम लागतील हे अवलंबून असते. मोटारसायकल खूप वर्षे बंद असेल तर हे कष्ट अधिक असतात. जुन्या मोटारसायकलीचे सुटे भाग बदलावे लागणार असतील तर त्यासाठी शोधाशोध करावी लागते. पुण्यात जुनी मोटारसायकल पुन्हा पूर्वीसारखी करून देणारे १० ते १२ लोक आहेत.’’
सायकलसारखी चाके असलेली १९२३ सालची ‘ट्रायम्फ’, रुबाबदार बांधणी असलेली १२०० सीसीची ‘इंडियन चीफ’, १९५५ सालची आणि ३५० सीसीची ‘नॉर्टन मॅन्क्स’, १९५५ चीच आणि आताही चांगली चालू स्थितीत असणारी ‘बीएसए गोल्ड स्टार’ आणि पूर्वी हैदराबादच्या निजामांकडे असलेली ‘झुंडाप’ अशा विविध मोटारसायकली या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.