शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती आणि संभाजी राजे यांची ३२५ वी पुण्यतिथीनिमित्त ‘राजमुद्रा’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १९ व २० फेब्रुवारी रोजी विश्रांवाडीतील कस्तुरबा सोसायटीमध्ये शिवस्फूर्तीमध्ये सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वासाठी खुले राहणार आहे.
प्रदर्शनामध्ये शिवकालीन नाणी, शिवाजी व संभाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगांची शंभरहून अधिक छायाचित्रे, रंगीत चित्रे, छत्रपती रियासतकालीन नाणी, तैलचित्रे, शस्त्र, जिरेटोप व पगडय़ा, विविध ग्रंथ आणि पुस्तके यांचा समावेश असणार आहे. तसेच गडासारखी दिसणारी तटबंदी व बुरूज आणि एक शिवकालीन वाडा यांसारख्या गोष्टीही या प्रदर्शनामध्ये बघता येणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी उपमहापौर बंडू गायकवाड यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे. शिवजयंती आणि संभाजी राजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रतिष्ठानतर्फे स्पर्धा, प्रदर्शन, पुरस्कार वितरण, दत्तक योजना, सामाजिक संस्थांना मदत आदी उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.