रुग्णालयांनी रुग्णांना आपल्याच औषध दुकानांमधून औषधे खरेदीची सक्ती करण्याबाबतचे प्रकरण गाजल्यानंतर आता औषधांसाठी मोजाव्या लागणाऱ्या प्रचंड किमतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत ‘लोकसत्ता’ने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला. डॉक्टरांनी रुग्णांना पर्यायी स्वस्त ब्रँडचे औषध किंवा जेनेरिक औषध जरूर सुचवावे, असे मत काही डॉक्टरांनी नोंदवले, तर काही डॉक्टरांनी स्वस्त औषधांच्या निर्मितीदरम्यान पाळल्या जाणाऱ्या मानकांनुसार औषधांचा दर्जा वेगवेगळा असल्याचे मत मांडले.
‘औषधे नागरिकांच्या आवाक्यात यावीत, यासाठी औषधांच्या किमतींवर सरकारने नियंत्रण आणून या किमती कमी करायला हव्यात, असे सांगून ‘आरोग्य सेने’चे डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, ‘डॉक्टरांनी रुग्णांना औषधाचा पर्यायी ब्रँड घेण्याची परवानगी द्यायला हवी. ‘बॉम्बे मार्केट’च्या स्वस्त औषधांना माझा विरोध आहे, पण चांगल्या कंपनीने बनवलेल्या जेनेरिक औषधाला द्यायला खळखळ का व्हावी? औषधाचा ‘मॉलेक्युल’ आणि औषधनिर्माती कंपनी या दोहोंना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी असेल व तीच कंपनी जेनेरिक औषध बनवत असेल, तर त्याबाबत काही प्रश्न नसावा. जगातील अनेक मोठय़ा कंपन्या जेनेरिक औषधे तयार करत असून जगात अनेक ठिकाणी ती वापरली जातात.’
दुसऱ्या बाजूस महाग औषधे ही विनाकारण महाग नसतात, असा मुद्दा ‘असोसिएशन ऑफ नर्सिग होम ओनर्स’चे अध्यक्ष डॉ. नितीन भगली यांनी मांडला. ते म्हणाले, ‘औषध निर्माती कंपनी व निर्मितीप्रक्रिया यासाठी ‘डब्ल्यूएचओ जीएमपी’, ‘युरोपियन स्टँडर्ड्स’ व ‘यूएस एफडीए’ या तीन प्रकारचे निकष आहेत. यात ‘डब्ल्यूएचओ जीएमपी’ (गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस) पाळणाऱ्या कारखान्यातील औषधाच्या दर्जाचे निकष किमान प्रकारचे असतात, तर अमेरिकन एफडीएचे निकष सर्वात कडक असतात. औषधाची स्थिरता (शेल्फ लाइफ) व शरीरात औषध कमीत कमी वेळात विरघळणे (बायोएव्हेलिबिलिटी) या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. औषधातील प्रमुख घटकाबरोबरच (अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रिडिअंट) औषध गोळीच्या स्वरूपात स्थिर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर घटकांबाबतही (एक्सपिंिअंट्स) यूएस एफडीएचे निकष असतात. रुग्णाला एखादे औषध सुचवण्यापूर्वी ते औषध बनवणारी कंपनीच त्याची उत्पादक आहे, की नुसती वितरक आहे हे आम्ही पाहतो. औषधाच्या कारखान्यासाठी पाळलेले निकषही इंटरनेटवर जाऊन पाहतो.’

‘भारतीय फार्माकोपिया आणि अमेरिकन फार्माकोपिया यातील फरक म्हणजे औषधांची ‘बायोइक्विव्हॅलन्स’ चाचणी. मूळ औषधाची रक्तातील पातळी व नंतर बनवल्या गेलेल्या औषधाची रक्तातील पातळी समान असणे ही चाचणी मुळात सर्व औषधांसाठी गरजेची नाही. ज्या थोडय़ा औषधांसाठी ती गरजेची आहे त्यांची यादीही उपलब्ध आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या औषधांसाठी येथील कोणतीही कंपनी ही चाचणी करत नाही. भारतीय कायद्यानुसार औषधाच्या गुणवत्तेबाबत ‘इंडियन फार्माकोपिया’चे, तर औषध कारखान्याबाबत ‘शेडय़ूल एम’चे पालन करणे बंधनकारक आहे, तर ‘डब्ल्यूएचओ जीएमपी’चे निकष औषधांच्या निर्यातीसाठी लागतात. जेनेरिक औषधांचा दर्जा डोळे झाकून चांगलाच असतो असे म्हणता येणार नाही, पण चांगल्या कंपन्यांची जेनेरिक औषधे घेण्यास हरकत नसावी. ’
– डॉ. अनंत फडके, ‘जन आरोग्य अभियान’