News Flash

भावसंगीताला श्रोत्यांची कौतुकसाथ हवी!

पॉप किंवा तिकडम संगीत सादर केल्यावर रसिक दाद देत असतील तर तरुण कवी संगीतकारांना नाइलाजाने तेच करावे लागेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

डॉ. सलील कुलकर्णी यांची गानरसिकांकडून अपेक्षा

पुणे : आशयघन काव्याला सुयोग्य चाल लावून रसिकांसमोर ते उत्तम पद्धतीने सादर करणे म्हणजे भावसंगीत. अनेकांनी उत्तमोत्तम रचनांद्वारे समृद्ध केलेली मराठी भावसंगीताची पालखी अविरत सुरू आहे. ‘रिमिक्स’च्या काळात समोर येत असलेल्या आशयघन भावसंगीताला रसिकांकडून कौतुकसाथ मिळायला हवी, अशी अपेक्षा प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी बुधवारी व्यक्त केली.

पॉप किंवा तिकडम संगीत सादर केल्यावर रसिक दाद देत असतील तर तरुण कवी संगीतकारांना नाइलाजाने तेच करावे लागेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र गाथा’ या वेब व्याख्यानमालेत डॉ. सलील कुलकर्णी यांनी भावसंगीताच्या समृद्ध परंपरेची माहिती देत आणि काही गीते सादर करीत सुरेल शब्दमैफल रंगविली. मिलिंद कुलकर्णी यांनी  त्यांच्याशी संवाद साधला.

भावगीत, भावसंगीताची व्याख्या करताना डॉ. सलील म्हणाले,‘भावसंगीताच्या पालखीत खांदे बदलत जातात, पण ही परंपरा पुढे सुरूच आहे. विषय खोल असतो तितका सोपाही असतो. ना. घ. देशपांडे यांच्या ‘रानारानात गेली बाई शीळ’ या गीताला जी. एन. जोशी यांनी संगीतबद्ध करून पहिले वहिले भावगीत ध्वनिमुद्रित के ले. गजाननराव वाटवे स्वत:ला ‘काव्य गायक’ म्हणायचे.  भावसंगीताची परंपरा गावागावांतील संगीत समूहांनी पुढे नेली आहे.’

बबनराव नावडीकर, मालती पांडे यांच्यापर्यंतची गाणी गोड होती. पण वसंत प्रभू यांच्यापासून गाण्यांतून कटू सत्य मांडण्याची सुरुवात झाली. दत्ता डावजेकर उत्तम संगीतकार होतेच, पण त्यांनी तांत्रिक बाजूंवर खूप उत्तम काम के ले. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे दर्शन घेतल्याशिवाय भावसंगीताच्या मंदिरात जाता येणार नाही. भावसंगीतात सुधीर फडके यांच्या गीतरामायणाची स्वतंत्र प्रश्नपत्रिका सोडवावीच लागेल. हा संगीतप्रकार लोकप्रिय होण्यात आकाशवाणीचाही मोठा वाटा आहे.

श्रीनिवास खळे यांच्या ‘श्रावणात घननिळा’ या गाण्याचा उल्लेख केला नाही तर भावसंगीतातला पावसाळा टाळण्यासारखे होते, अशी टिपणी करून कुलकर्णी म्हणाले,की  खळे आणि हृदयनाथ मंगेशकर  यांनी भावसंगीताची रुळलेली वाट सोडून वेगळी वाट पकडली. त्यांची गाणी आकर्षित करतात, पण ती सहज गुणगुणण्यासारखी नाहीत. गदिमा, शांता शेळके , बा. भ. बोरकर, मंगोश पाडगावकर, आरती प्रभू , ग्रेस, सुधीर मोघे यांच्या आशयसंपन्न कवितांमुळे भावगीताचा प्रांत अधिक समृद्ध झाला.

संगीत, वाद्ये, संगीतप्रवाहांविषयीचे पांडित्य असलेले पं. भास्कर चंदावरकर, अनिल-अरुण, हेमंत भोसले, अशोक पत्की, श्रीधर फडके, सुधीर मोघे, आनंद मोडक यांनी भावसंगीतामध्ये भर घातली. मिलिंद इंगळे यांच्या ‘गारवा’ने भावसंगीताला नव्या रूपात आणले. कौशल इनामदार, अवधूत गुप्ते, संदीप खरे, नरेंद्र भिडे उत्तम काव्य संगीतबद्ध करणारे कलावंत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सध्या भावसंगीताचा  दर्जा कमी झाला असे वाटत नाही. गर्दी वाढली आहे. दर्जाचा विचार न करता भावसंगीत आणले जाते हे मान्य आहे, असेही सलील कुलकर्णी यांनी सांगितले.

‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविक केले. भक्ती बिसुरे यांनी सूत्रसंचालन केले.

 

ठळक नोंदी…

शिक्षकांनी भाषेवर प्रेम करायला शिकवताना शाळेतच पहिली भावकविता म्हणवून घेतली. पण, आपण भावगीत म्हणत आहोत हे तेव्हा जाणवले नाही.

बदलत गेलेल्या सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब भावसंगीतात उमटले. भावसंगीताची भाषा बदलली.

रवींद्र संगीत आणि मराठी भावसंगीतात साम्य आहे. दोन्हींकडे  श्रद्धेने संगीत जपले जाते.

गझल हा उपशास्त्रीय आणि भावसंगीताचा वेश पांघरलेला, पण भावसंगीताचा प्रकार आहे.

संगीताची महती…

संगीत काही काळ तरी रसिकाला शांत करते. आई होऊन प्रेमाने जवळ घेते. प्रेयसी होऊन मिठीत घेते. आजी होऊन जुन्या पैठणीचा गंध देते आणि मित्र होऊन गळ्यात हात टाकून गप्पा मारते, अशा शब्दांत सलील कुलकर्णी यांनी संगीताची महती सांगितली. सध्याच्या करोना काळात अनेकांनी संवादिनी घेत गुणगुणण्याचा प्रयत्न करून आनंद मिळविला असेल. तुमच्यातल्या छोट्या मोठ्या गायकाला गाऊ  द्यावे, तुम्हाला नक्कीच काही काळ विश्राम मिळेल, असा सल्ला त्यांनी दिला.

गरज काय?

भावसंगीताच्या पालखीचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी आकाशवाणी हे एकच माध्यम होते. आता माध्यमे अनेक आहेत. कलाकार काम करत आहेत. रसिकांनीही भावसंगीतापर्यंत पोहोचायला हवे, थोडा शोध घ्यायला हवा, अशी गरज कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:51 am

Web Title: expectations from dr salil kulkarni akp 94
Next Stories
1 खाटा उपलब्धतेचा पुणे पालिकेचा दावा फोल
2 पुणे-मुंबई डेक्कन क्वीनही रद्द
3 टोकनसाठी पहाटे पाचला या!
Just Now!
X