‘‘आपले सामाजिक, सांस्कृतिक मतभेद बाजूला ठेवून, कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कौशल्यावर आधारित शिक्षण आणि कौशल्य विकास हे आपले राष्ट्रीय उद्दिष्ट असले पाहिजे. पुण्याकडून कौशल्य विकासाच्या कामात भरीव कामगिरी अपेक्षित आहे,’’ असे मत नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष एस. रामदुराई यांनी मंगळवारी व्यक्त केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या दुसऱ्या वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये रामदुराई बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार उपस्थित होते.
या वेळी रामदुराई म्हणाले, ‘‘कुशल मनुष्यबळ मिळत नाही, अशी तक्रार देशातील उद्योग जगतातून सातत्याने करण्यात येते. कौशल्याअभावी देशातील फक्त २५ टक्के अभियंत्यांना रोजगाराच्या संधी मिळतात. त्यामुळे देशाने आणि शिक्षण व्यवस्थेने कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सांस्कृतिक आणि सामाजिक मतभेदांचा परिणामही कामगारांच्या कौशल्य विकासावर होताना दिसत आहे.
परदेशामध्ये प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून शिक्षण देण्यावर भर देण्यात येतो. त्यामुळे परदेशामध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. पुण्यासारख्या शिक्षणाबरोबरच आयटी आणि वाहन उद्योग क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेल्या ठिकणी कौशल्य विकासासाठी अधिक भरीव कामगिरी होणे अपेक्षित आहे. पुण्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणसंस्था आहेत आणि उद्योगही मोठय़ा प्रमाणावर आहेत. मध्यम आणि छोटय़ा उद्योगांचे प्रमाणही खूप आहे. उद्योगसमूह आणि शिक्षणसंस्था यांनी एकत्र येऊन कौशल्य विकासासाठी काम करणे पुण्यात शक्य होऊ शकते.’’