News Flash

शहराध्यक्ष म्हणतात : राष्ट्रवादीबरोबरचा अनुभव समाधानकारक नाही

बागवे- महापालिकेत राष्ट्रवादीबरोबर आघाडी झाली त्याचा फायदा झाला की तोटा हे सांगता येणार नाही.

रमेश बागवे शहराध्यक्ष, काँग्रेस

महापालिकेतील सत्तेत राष्ट्रवादीबरोबर केलेल्या आघाडीचा फायदा झाला की तोटा?

बागवे- महापालिकेत राष्ट्रवादीबरोबर आघाडी झाली त्याचा फायदा झाला की तोटा हे सांगता येणार नाही. मात्र त्यांच्या बरोबरचा अनुभव फारसा चांगला आणि समाधानकारक नव्हता. त्यांनी शब्द पाळला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर फरफट झाली असेही म्हणता येणार नाही. भाजपच आमचा प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी असेल. शहर विकासाच्या मुद्दय़ावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू. आघाडी झाली नाही, तर राष्ट्रवादीने पुणेकरांवर लादलेल्य करवाढीचा मुद्दा हाती घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहोचू.

राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच आघाडी होणार का ?

बागवे- राष्ट्रवादी काँग्रससमवेत आघाडी करू नये, स्वबळावरच लढावे, अशी कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी आहे. ही मागणी पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. शहराध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार व्हावा, असे मला वाटते. मात्र आघाडीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल. राष्ट्रवादीकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र आघाडी करायची झाल्यास सन्मानाने व्हावी. आमच्या जेवढय़ा जागा आहेत तेवढय़ा द्याव्यात, उर्वरित जागांबाबत विचारविनिमय करून सन्मानपूर्वक निर्णय घ्यावा, अशी आमची भूमिका आहे.

अंतर्गत गटबाजीचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे का?

बागवे- काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाला प्रदीर्घ परंपरा आहे. पक्षातील अंतर्गत वाद आता संपुष्टात आले आहेत. पक्षाचे सर्व आजी-माजी आमदार, पदाधिकारी एकत्र येऊन काम करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करीत आहेत. यापूर्वीही पक्षात गटबाजी नव्हती. पक्षात ऐक्याचे वातावरण निर्माण झाल्याचा फायदा पक्षाला निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर होईल.

पक्षाचे नगरसेवक अन्य पक्षात जाण्याचा काय परिणाम?

बागवे- पक्षाचे काही नगरसेवक भाजप आणि अन्य काही पक्षात गेले. सत्ता आणि विविध प्रकारच्या आमिषांना बळी पडूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पक्षाने त्यांना सन्मान दिला, पद दिले पण ते एकनिष्ठ राहिले नाहीत. नागरिक त्यांना त्यांची जागा दाखवतील. पक्ष म्हणून काँग्रेसवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. आमच्याकडे दुसरी फळी तयार आहे. सक्षम उमेदवार आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेस सोडून अन्य पक्षात गेलेले नगरसेवक-पदाधिकारी त्या पक्षातही राहतील की नाही, ही शंका आहे.

काँग्रेसकडे येण्याचा कल कितपत आहे?

बागवे- काँग्रेस पक्षातून अन्य पक्षात आमचे नगरसेवक-पदाधिकारी गेले असले, तरी काँग्रेसकडेही अनेकांनी संपर्क साधला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते काँग्रेसमध्ये दाखल होतील.

पक्षाची व्यूहरचना काय ?

बागवे- महापालिका निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर पक्षाकडून निवडणुकीसाठीची जोरदार तयारी सुरू झाली. प्रत्येक प्रभागात, ब्लॉक पातळीवर आणि विधानसभा मतदार संघ निहाय मेळावे, बैठका घेण्यात आल्या. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे अपयश, वाढती महागाई या सारख्या मुद्दय़ांवरून सातत्याने आंदोलने आणि धरणे धरण्यात आली. त्यातून मोठय़ा प्रमाणात काँग्रेस पक्षाला अनुकूल वातावरण निर्मिती झाली आहे. बैठका, मेळाव्यांमुळे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य आले आहे. त्यातूनच सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते मनाने एकत्र आले असून एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी झाली आहे.

मुलाखत- अविनाश कवठेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 3:23 am

Web Title: experience is not satisfactory with the ncp say ramesh bagwe
Next Stories
1 अजून आठवते.. : अनोळखी व्यापाऱ्याने पाकीट दिले.. – रमेश बोडके
2 लोक मतदान का करत नाहीत..?
3 शहरबात पुणे : विकास आराखडा झाला, आता अंमलबजावणी हवी
Just Now!
X