चिन्मय पाटणकर 

पुण्यातील रंगभूमीवर जसे नवे कलाकार नवे प्रयोग करतात. तसंच अनुभवी आणि ज्येष्ठ कलाकारही आवर्जून नवं काही करण्याचा प्रयत्न करतात. आसक्त आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थांच्या नव्या नाटकांतून पुणेकर नाटय़प्रेमींना अनुभवी कलाकारांची नवी  कलाकृतीपाहण्याची संधी मिळणार आहे.

मॅथेमॅजिशियन – ग्रीक शोकनाटय़

आसक्त या नाटय़संस्थेनं नेहमीच चाकोरीबाहेरचे प्रयोग केले आहेत. आता ही संस्था एक ग्रीक शोकनाटय़ रंगभूमीवर घेऊन आली आहे. हिंदूी उर्दू भाषेतला हा एकल दीर्घाक असून,  मोहित टाकळकरनं त्याचं दिग्दर्शन केलं आहे. शुक्रवारी ४ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात त्याचा प्रयोग होणार आहे. देशभरात विविध ठिकाणी या नाटकाचे प्रयोग झाले आहेत.

‘मॅथेमॅजिशियन’ ही इ. स. ५०० मध्ये ग्रीसचं व्यापारी केंद्र असलेल्या बॅबिलॉन शहरातल्या निकोर या अर्थशास्त्र-गणितात निपुण असलेल्या तरुणाची गोष्ट आहे. त्याच्याकडे आनंद आणि समाधान सोडून सारं काही आहे. त्यासाठी तो काय करतो, त्याची कहाणी या नाटकात आहे. इप्सिता चक्रवर्ती सिंग हा एकल नाटय़प्रयोग सादर करत आहे. इंग्रजीतल्या महत्त्वाच्या नाटककार गौरी रामनारायण यांनी लिहिलेल्या या नाटकाचं तारिक सिद्दीकी यांनी हिंदी उर्दू रुपांतर केलं आहे.

या नाटकाविषयी दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणतो, ‘आतापर्यंत मी बरेच कलाकार असलेली नाटकं केली. मात्र, मला स्वतला आव्हानात्मक वाटेल, असा प्रयोग करायचा होता. ती संधी या नाटकातून मिळाली. एक अभिनेता, त्याचं शरीर आणि शब्द यांतून एक नाटय़ानुभव देण्याचा हा एक प्रयत्न आहे.’

*  डॉक्टर-रुग्णातील विसंवाद आता रंगमंचावर

‘काटकोन त्रिकोण’ या नाटकानं प्रायोगिक रंगभूमीबरोबरच व्यावसायिक रंगभूमीही गाजवली होती. त्यानंतर नाटककार डॉ. विवेक बेळे आणि ज्येष्ठ अभिनेता डॉ. मोहन आगाशे पुन्हा एका नाटकातून एकत्र आले आहेत. महाराष्ट्र कल्चरल सेंटर डॉ. विवेक बेळेलिखित दिग्दर्शित ‘जरा समजून घ्या’ हे नाटक रंगमंचावर आणत आहे. तिरकस आणि खुसखुशीत लेखनासाठी प्रसिद्ध असलेले नाटककार डॉ. विवेक बेळे यांनी या नाटकातून डॉक्टर-रुग्णातील विसंवादाचं चित्रण केलं आहे. या नाटकाचा प्रयोग शनिवारी सायंकाळी सात वाजता आणि रविवारी सकाळी ११ वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे होणार आहे.

महाराष्ट्र कल्चरल सेंटरनं या आधी डॉ. बेळे यांच्या ‘नेव्हर माइंड’, ‘माकडाच्या हाती श्ॉम्पेन’, ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’, ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकांची निर्मिती केली आहे. आलीकडच्या काळात डॉक्टर्स आणि रुग्ण या नात्यामध्ये एक प्रकारची तेढ निर्माण झाली आहे. डॉक्टर्स आणि रुग्णांमधील सुसंवाद कमी होऊ न विसंवाद प्रकर्षांनं  पुढे येऊ  लागला आहे. या नाटकातून याच बदलत्या नात्यावर प्रकाश टाकण्याचा, त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाटकात डॉ. मोहन आगाशे यांच्यासह मंजुषा गोडसे यांचीही भूमिका आहे. अभय गोडसे यांनी नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे.

chinmay.reporter@gmail.com