मुदतवाढीबाबत संगणक प्रणालीत आवश्यक बदल

पुणे : मुदत संपलेल्या वाहन चालविण्याच्या परवान्याची  त्याचप्रमाणे शिकाऊ परवाना आणि वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राबाबतही ३० सप्टेंबपर्यंतची मुदतवाढ असून, त्याबाबत राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (एनआयसी) संगणक प्रणालीत योग्य ते बदल करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहे.

टाळेबंदीच्या कालावधीमध्ये शिकाऊ-पक्का वाहन परवाना, योग्यता प्रमाणपत्र आदींच्या मुदतवाढीबाबत केंद्र शासनाने निर्णय घेतला होता. राज्यभरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून याबाबतची कामे सुरू केल्यानंतर संबंधित निर्णयानुसार एनआयसीच्या संगणक प्रणालीत बदल न झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे मुदतवाढीचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याबाबत राज्य पातळीवर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने तक्रार दाखल केली होती. मात्र, याबाबत आता पुणे परिवहन कार्यालयाने स्पष्टीकरण दिले असून, संगणक प्रणालीत बदल झाले असून, त्यानुसार मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओतील शिकाऊ, पक्क्य़ा परवान्याचे कामकाज १९ जूनपासून सुरू करण्यात आले. त्यानंतर कोणत्याही अडथळ्याविना ३४२ शिकाऊ आणि ३३७ पक्के वाहन परवाने देण्यात आले आहेत.

तक्रारीनंतरच प्रणालीतील बदलाची माहिती

मुदतवाढीबाबत केंद्राच्या निर्देशांनंतर एनआयसीकडून संगणकीय प्रणालीत तातडीने बदल करणे आवश्यक होते. आम्ही याबाबत थेट केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार दाखल केल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी सांगितले. आता संगणक प्रणालीत बदल केल्यानंतर परिवहन कार्यालय किंवा एनआयसीने ते नागरिकांसाठी का जाहीर केले नाहीत, असा प्रश्नही घाटोळे यांनी उपस्थित केला आहे.