18 October 2018

News Flash

मुदत संपलेल्या औषधांची दिवे घाटात जाळून विल्हेवाट

खडकी परिसरात रहाणारे आसिफ शेख यांच्या जागरूकतेमुळे हा प्रकार उघड झाला आहे.

मुदत संपलेल्या औषधांची विल्हेवाट लावण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून घालून देण्यात आलेल्या नियमांची पायमल्ली करत कित्येक टन औषधे पुण्याजवळच्या दिवे घाटाच्या परिसरात फेकून देण्यात येत असून ही फेकलेली औषधे तेथे जाळून टाकली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे शहरातून सासवडच्या दिशेने जाताना दिवे घाटाच्या सुरुवातीपासून औषधांचे ढीग रस्त्याच्या कडेला दिसायला सुरुवात होते. संपूर्ण घाट रस्ता चढून मस्तानी तलाव नजरेस पडेपर्यंत काही ठिकाणी नुसती टाकून दिलेली तर काही ठिकाणी अर्धवट जळलेली औषधे दिसतात. औषधांमधील रासायनिक घटक जळल्यामुळे या परिसरात उग्र दरुगधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या परिसरात पाहणी करताना देखील नाकावर रुमाल धरल्याशिवाय उभे राहणे शक्य नसल्याचे ‘लोकसत्ता’च्या पाहणीत आढळून आले.

खडकी परिसरात रहाणारे आसिफ शेख यांच्या जागरूकतेमुळे हा प्रकार उघड झाला आहे. आसिफ शेख त्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने वारंवार पुणे ते दिवे घाट मार्गे सासवड हा प्रवास करतात. या प्रवासामध्ये घाट परिसरात अनेक खोक्यांमधून कचऱ्याचे ढीग घाटात ठिकठिकाणी टाकण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या खोक्यांमध्ये नेमका कसला कचरा आहे याची पाहणी केली असता तो कचरा मुदत उलटून गेलेल्या औषधांचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच हा औषधांचा कचरा जाळला जात असल्याचेही दिसले. त्यानंतर विविध सरकारी अधिकाऱ्यांशी याबद्दल संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी याकडे फारसे गांभीर्याने लक्ष न दिल्याचे शेख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

शेख म्हणाले, पुण्याहून सासवडकडे जाताना उरुळी, फुरसुंगी गावे ओलांडून दिवे घाटाच्या सुरुवातीपासून औषधांचा कचरा दिसण्यास सुरुवात होते. मोठमोठाल्या खोक्यांमध्ये किंवा पोत्यांमध्ये भरून हा कचरा घाट रस्त्याच्या कडेला किंवा दरीत टाकला जातो. अनेकदा ही औषधे जाळण्याचे कामही या परिसरात सुरू असते. एखाद्या कंपनीचा कर्मचारी असावा त्याप्रमाणे टापटीप कपडय़ांमधील व्यक्ती आणि काही कामगार ही औषधे जाळताना दिसतात. त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे या मार्गावरून जाताना श्वास घेणे अवघड होते.

दिवे घाट आणि सासवडचा परिसर निसर्गरम्य असून मोकळी हवा हे या परिसराचे वैशिष्टय़ आहे. ऐतिहासिक मस्तानी तलाव येथून नजरेच्या टप्प्यात आहे. अशा भागात औषधांचा कचरा जाळून येथे पर्यावरणाचे आणि पर्यायाने हवेचे प्रदूषण होत आहे. या प्रकाराबद्दल कोणाकडे तक्रार करायची हे न समजल्यामुळे व्यक्तिगत स्तरावर वन विभाग, अन्न आणि औषध प्रशासन अशा विविध पातळ्यांवर संपर्क केला. मात्र एकाही विभागाने हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही, असेही शेख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

कचऱ्यात काय काय?

औषधे खरेदी करण्यासाठी औषधाच्या दुकानात गेल्यानंतर नजरेस पडणारी अनेक औषधे सध्या दिवे घाटातील रस्त्याच्या कडेला कचऱ्यात पडलेली दिसून येत आहेत. सुटय़ा गोळ्या, कॅप्सूल्सची पाकिटे, इंजेक्शन स्वरूपात देण्यासाठी लहान बाटल्यांमध्ये उपलब्ध असलेली द्रवरूप औषधे, उच्च दर्जाची प्रतिजैविके, वेदनाशामक गोळ्या, मलम, प्रोटीन पावडरचे डबे, जखमांवरील बँडेज बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिकटपट्टीचे रोल कचऱ्यामध्ये आहेत. यापैकी बरीचशी औषधे २०१४ च्या दरम्यान मुदत संपलेली आहेत. मानवी आजारांवर दिल्या जाणाऱ्या औषधांबरोबरच प्राण्यांच्या काही औषधांचाही या कचऱ्यामध्ये समावेश आहे.

First Published on December 8, 2017 4:50 am

Web Title: expiry date medicines burns in dive ghat