नारायण पेठेतील जिजाई प्रकाशन येथे टपालामार्फत पाठविण्यात आलेल्या एका पाकिटामध्ये स्फोटके आढळून आली. स्फोटकांमध्ये पिवळ्या रंगाचा स्फोटक पदार्थ व एका अॅल्युमिनिअमच्या कांडीचा समावेश आहे. पाकिटातील पदार्थ स्फोटकेच असल्याची खात्री पोलिसांनी केली असून, याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण पेठेतील जिजाई प्रकाशन येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अजय भोसले यांच्या नावाने शनिवारी एक पाकीट आले. इमारतीच्या मालकाने भोसले यांना दूरध्वनी करून याबाबतची माहिती दिली. भोसले यांनी पाकीट ताब्यात घेऊन ते उघडले. पाकिटात बातम्यांची कात्रणे होती. त्याचप्रमाणे एक पिवळा पदार्थ व वायर लावलेली अॅल्युमिनियमची कांडी होती. त्याचप्रमाणे बातम्यांमधील काही नावांवर फुल्या मारण्यात आल्या होत्या. त्यामुळे भोसले यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथकाला बोलावून घेतले. पथकातील श्वानाने पाकिटाचा वास घेऊन त्यातील पदार्थ स्फोटक असल्याचा इशारा केला. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पाकिटावर टिळक रस्त्यावरील टपालाचे शिक्के आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त तुषार दोशी यांनी सांगितले, की प्रथमदर्शनी लिफाप्यातील पदार्थ हा स्फोटक असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार स्फोटके प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही स्फोटके न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.