पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटातील खोपोली एक्झिटजवळ एक खासगी प्रवासी बस पुलाच्या संरक्षक कठडय़ाला धडकून झालेल्या अपघातामुळे दरीत पडून दोनजण ठार, तर सात प्रवासी जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर काही काळ या भागात वाहतूक विस्कळीत झाली होती.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधून मुंबईकडे जात असलेली जय सेवालाल ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस खोपोली घाटातील आडोशी येथे आली असता तीव्र उतारावर बसचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे बसचालकाने ही बस रस्त्याच्या दोन्ही मार्गीकेच्या मधोमध असलेल्या पुलाच्या संरक्षक कठडय़ाकडे नेली. बसचा वेग अधिक असल्याने कठडय़ावर बस जोरात आदळली. त्यामुळे बसच्या केबिनमध्ये असलेले बसचे दोन चालक व एक प्रवासी थेट दरीत कोसळले. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. त्यात बसचा सहायक चालक जितू चव्हाण (वय २६, रा. कर्नाटक) याचा समावेश आहे. दुसऱ्याचे नाव अद्याप कळाले नाही.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील जखमी प्रवाशांना व इतर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.