पुणे : मुंबई-लातूर-बिदर एक्स्प्रेसमध्ये जागेवरून झालेल्या वादातून दहा ते बाराजणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत कल्याण येथे राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पुणे ते दौंड रेल्वे स्थानकादरम्यान गुरुवारी ही घटना घडली. आरोपींमध्ये महिलांचाही समावेश आहे.

सागर मरकड, असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सागर हा पत्नी ज्योती, आई आणि दोन वर्षे वयाच्या मुलीसह एक्स्प्रेसमधून प्रवास करीत होता. सोलापूरमध्ये एका नातलगाकडे ते निघाले होते. दुपारी तिघेही पुणे स्थानकातून गाडीमध्ये चढले. गाडीच्या सर्वसाधारण डब्यामध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. बसायला कोठेच जागा नव्हती. आई आणि पत्नी सोबत असल्याने सागरने आसनावर बसलेल्या एका महिलेला काहीसे सरकून बसून थोडी जागा देण्याची विनंती केली. त्यावर संबंधित महिलेने चिडून जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावरून दोघांत वाद निर्माण झाला. त्यात संबंधित महिलेच्या बाजूने आणखी काही महिला आणि पुरुषांनी बोलण्यास सुरुवात केली.

काही वेळाने सर्वानी मिळून सागरला लाथा-बुक्क्य़ांनी मारहाण सुरू केली. सागरची आई आणि पत्नीने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित आरोपींनी त्याला मारहाण सुरूच ठेवली. दौंड स्थानक येईपर्यंत सागरला मारहाण केली जात होती. त्यात तो गंभीर जखमी झाला. दौंड स्थानक येताच त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता.