मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (एक्सप्रेस वे) खंडाळा घाटात दैनंदिन होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे हा महामार्ग सध्या संथगती बनला आहे. या मार्गावर शनिवारी दिवसभर अमृतांजन पूल ते आडोशी बोगदा या दरम्यान पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वाहनांची प्रचंड कोंडी झाल्याने वाहने अत्यंत कमी वेगाने घाट चढत होती.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पूल ते खंडाळा बोगदा दरम्यानच्या टेकडीवर सुरक्षा जाळ्या बसविण्याचे काम २२ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आले आहे. हे काम ११ मार्चपर्यंत चालणार आहे. शासकीय सुटीमुळे शनिवारी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या गाडय़ांची संख्या मोठी होती. तसेच लोणावळ्यात येण्यासाठी पर्यटकांच्या वाहनांची संख्याही मोठी होती. भल्या पहाटेपासूनच या वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक कोलमडली होती. बोरघाटातील प्रचंड चढण व त्यातच अमृतांजन पुलापासून खंडाळा बोगदा दरम्यान एक मार्गिका बंद असल्याने वाहतुकीचा ताण एक्सप्रेस वेवर आला आणि कोंडी अधिकच वाढली. ही वाहने अत्यंत धिम्या गतीने पुढे सरकत असल्याने अनेक अवजड वाहने घाटात बंद पडली. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली.