मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा येथील बोरघाटात होणारा अपघात आणि त्या पाठोपाठ किमान काही तासांसाठी होणारी वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. शुक्रवारी सकाळीही घाटात अमृतांजन पुलाजवळ एक ट्रक उलटला आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तीन तासांसाठी ठप्प झाली.. त्यामुळे हा मार्ग द्रुतगती न ठरता अनेकदा वेळ खाणाराच मार्ग ठरू लागला आहे.
बोरघाटात पोलीस चौकीजवळील अंडा9Traffic2 पॉइंट येथील वळणावर शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर लाकडी फळ्यांनी भरलेला एक ट्रक उलटला. तो दूर करेपर्यंत तीन तास गेले. या काळात वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईकडे निघालेल्या लोकांचे मोठे हाल झाले. अनेकांनी खंडाळा बोगद्यापासून वाहने वळवून जुन्या महामार्गाने मुंबईच्या दिशेने जाणे पसंत केले. तरीसुद्धा मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर जवळपास तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आजच्या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
अपघात आणि त्यानंतर होणारी वाहतुकीची कोंडी अशा प्रकारची ही गेल्या तीन दिवसांतील दुसरी घटना आहे, तर गेल्या दोन आठवडय़ांतील हा तिसरा प्रकार आहे. गेल्या मंगळवारी (६ जानेवारी) पहाटे बोरघाटात अमृतांजन पुलाजवळच एक क्रेन आणि ट्रक यांच्यात अपघात झाला होता. त्याच्यामुळे पहाटे साडेचार ते सकाळी साडेअकरा या काळात घाटातील वाहतुकीची कोंडी झाली होती. डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ातही याच परिसरात अपघात झाल्यानंतर वाहतूक चार तासांसाठी ठप्प झाली होती.
 का व कशामुळे?
बोरघाटाचा पूर्ण भाग चढ-उताराचा असल्याने येथे अनेकदा वाहतूक कोंडी होते. मुंबईकडे जाताना अनेक वेळा मोठय़ा वाहनांचे चालक वाहने न्यूट्रल करून जातात. यामुळे तीव्र वळणावर वाहनावरील ताबा सुटून अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. या भागात वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी ही नित्याची बनली आहे. या भागात कोंडी झाल्यानंतर ती तातडीने दूर करण्यासाठी आणि अपघातग्रस्त वाहने लगेचच बाजूला करण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीकडे सक्षम यंत्रणा नाही. त्याचाही परिणाम येथे पाहायला मिळतो.