पालकमंत्र्यांच्या दबावामुळे टाळेबंदीस मुदतवाढ; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विरोध डावलला

करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे कारण पुढे करत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ठाम विरोधानंतरही केवळ पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या दबावामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय शुक्रवारी येथील प्रशासनाला जाहीर करणे भाग पडले.

विशेष म्हणजे, एरवी टाळेबंदीविरोधात नाक मुरडणारे राष्ट्रवादीचे अग्रणी नेतेच आपल्या जिल्ह्य़ात असा निर्णय घेत असल्याचे पाहून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुपारनंतर ठाण्यासह जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांमध्ये टाळेबंदीची मुदत वाढविण्याचा आग्रह धरला आणि तेथेही प्रशासनासह पोलिसांना हा निर्णय घ्यावा लागला.

करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे कारण देत २ जुलैपासून ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांमध्ये संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या अर्थचक्रास गती देण्याच्या प्रयत्नांना पूर्ण हरताळ फासला गेला असून बाधितांची संख्याही अद्याप आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे ही टाळेबंदी मुदत संपताच उठवली जाईल आणि किमान सवलतींनी मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्य़ातील दैनंदिन व्यवहार सुरू होतील, असा कयास बांधला जात होता. अशा स्वरूपाच्या टाळेबंदीस राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून असलेल्या विरोधाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाड यांनीही या टाळेबंदीस जाहीर विरोध केला होता. शुक्रवारी दुपारी पुण्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे कारण देत टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने सगळे चित्र पालटले.

पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर पालिका अधिकाऱ्यांनी टाळेबंदी नकोच, अशी ठाम भूमिका मांडली. मात्र पालकमंत्री पवार यांच्या दबावामुळेच पुण्यात सक्तीची टाळेबंदी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केला.

टाळेबंदीला विभागीय आयुक्तालयातील अधिकारी, पोलिसांनी पाठिंबा दिला. मात्र पालकमंत्र्यांच्या भूमिके ला महापालिका अधिकाऱ्यांचा विरोध कायम होता. त्यामुळे अजित पवार यांनी टाळेबंदीचा निर्णय अधिकाऱ्यांनी चर्चेतून घ्यावा आणि तो जाहीर करण्याची सूचना करत बैठक संपवली. त्यानंतर दूरध्वनीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना टाळेबंदीची माहिती पत्रकारांना देण्याची सूचना केली. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठकीनंतर स्वतंत्र पत्रकार परिषदेत दहा दिवसांची टाळेबंदी जाहीर केली.

नवा निर्णय..

पुणे, पिंपरी चिंचवड आणि हवेलीमध्ये १३ ते २४ जुलै या काळात संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. पहिले पाच दिवस या भागात कठोर टाळेबंदी असेल. पहिल्या पाच दिवसांत केवळ दूध वितरण तसेच औषधे दुकाने आणि रुग्णालये सुरू राहातील. वृत्तपत्रांचे वितरणही या काळात सुरू राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. ठाणे, कल्याण डोंबिवली शहरांमध्ये १९ जुलैपर्यंत टाळेबंदीची मुदत वाढविण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा मीरा-भाईंदर येथे आणखी नऊ दिवस टाळेबंदीची मुदत वाढविण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

अजित पवारांच्या निर्णयामुळे सेनेला बळ..

* पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील टाळेबंदीस अजित पवारांच्या आग्रहामुळे हिरवा कंदील मिळाल्याचे पाहून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जिल्ह्य़ातील शहरी भागातील टाळेबंदीची मुदत वाढविण्याचा आग्रह धरला.

* पालकमंत्री आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनीही त्यास होकार भरला.

* या निर्णयानंतर काही मिनिटांतच कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर या शहरांमध्येही १९ जुलैपर्यंत टाळेबंदीत वाढ करण्याचा निर्णय तेथील आयुक्तांनी घेतला.

* नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर येथेही येत्या २४ तासांत मुदतवाढीचा निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.

झाले काय?

पुण्याच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला सुरुवात होताच टाळेबंदीवरून चर्चा सुरू झाली. पुणे, पिंपरी चिंचवडमधील महापालिका अधिकाऱ्यांनी टाळेबंदीला विरोध दर्शवला. टाळेबंदी हा पर्याय होऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका मांडली. मात्र करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ठाणे, नवी मुंबईच्या धर्तीवर शहरात काही कालावधीसाठी टाळेबंदी करून कठोर निर्बंध लागू करावेत, अशी भूमिका पालकमंत्री पवार यांनी मांडली.

ठाणे जिल्ह्य़ात टाळेबंदीतही १४ हजारांची रुग्णवाढ

ठाणे जिल्ह्य़ामध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठ दिवसांपासून टाळेबंदी लागू करण्यात आली असली तरी या काळात जिल्ह्य़ात १४ हजार २०७ नवे रुग्ण आढळून आले. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सर्वाधिक रुग्णवाढ होत असून, त्यापाठोपाठ ठाणे महापालिका क्षेत्राचा क्रमांक आहे. टाळेबंदीच्या काळात नवी मुंबईतील रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली असून भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथे रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही.