पदव्युत्तर पद्धतीने बहि:स्थ अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने पूर्वीचेच निकष लागू केले असून पदवीपर्यंतचे शिक्षण नियमित पद्धतीने पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाही बहि:स्थ अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. त्याचबरोबर बहि:स्थच्या विद्यार्थ्यांसाठी आता ‘कॉन्टॅक्ट लेसन्स’ ही आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
बहि:स्थ अभ्यासक्रमांबाबत सुरू असलेल्या गदारोळावर व्यवस्थापन परिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर आता पडदा पडला आहे. बहि:स्थच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आता नियमित विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. बहि:स्थ अभ्यासक्रमाला पर्याय उपलब्ध होईपर्यंत बहि:स्थच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्यात येऊ नये, असा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. बहि:स्थ पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने या विद्यार्थ्यांसाठी ‘कॉन्टॅक्ट लेसन्स’ तयार करण्यात येणार असून या वर्षी पासून विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत ५ डिसेंबरला होणाऱ्या विद्यापरिषदेच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठी वर्ग घ्यावेत का, परीक्षेबरोबरच काही प्रकल्प द्यावेत का, अशा मुद्दय़ांबाबत विद्यापरिषदेमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बहि:स्थसाठी प्रवेश घेता आलेले नाहीत, त्यांच्यासाठी ३० नोव्हेंबपर्यंत पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशी माहिती गाडे यांनी दिली.
या वेळी गाडे म्हणाले, ‘‘बहि:स्थबाबत व्यवस्थापन परिषदेने अंतिम निर्णय जाहीर केलाच नव्हता. प्रत्येक वेळी निर्णय प्रक्रिया सुरू आहे, असे विद्यापीठाकडून सांगण्यात येत होते. विद्यापीठाने आज घेतलेला निर्णय हा अंतिम आहे.’’
बहि:स्थचे शेवटचे वर्ष?
बहि:स्थ अभ्यासक्रमाला पर्याय उपलब्ध होईपर्यंत बहि:स्थच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल न करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. बहि:स्थला पर्याय म्हणून दूरशिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे दूरशिक्षण अभ्यासक्रमाची संमती मिळाल्यानंतर बहि:स्थ पद्धती बंद होणार आहे. दूरशिक्षण सुरू करण्याबाबतची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे. एक ते दीड वर्षांमध्ये दूरशिक्षण पद्धती सुरू होईल, अशी माहिती डॉ. गाडे यांनी दिली.
न्यायालयात गेल्यास विद्यापीठ अडचणीत?
बहि:स्थ पद्धतीबाबत विद्यापीठ कायद्यामध्ये ठोस तरतूद नाही. त्यामुळे बहि:स्थच्या वैधानिक स्थितीबाबत विद्यापीठाकडून आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांकडून शंका घेतली जात होती. या पाश्र्वभूमीवर बहि:स्थ पद्धती ठेवूच नये अशीही भूमिका काही सदस्यांनी यापूर्वी घेतली होती. बहि:स्थच्या वैधानिक स्थितीबाबत विचारले असता डॉ. गाडे यांनी सांगितले, ‘‘पूर्वी विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन बहि:स्थ अभ्यासक्रम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर सर्व विद्यापीठांनी बहि:स्थ पद्धती बंद केली आणि दूरशिक्षणाचा अवलंब केला. पुणे विद्यापीठाने दूरशिक्षणाचा अवलंब का केला नाही, त्याबाबत काही सांगता येणार नाही. मात्र, बहि:स्थ अभ्यासक्रमाबाबत घेण्यात आलेले निर्णय हे विद्यापीठाच्या अधिकारमंडळांच्या संमतीनेच घेण्यात आले होते. सध्या कायद्यामध्ये बहि:स्थ अभ्यासक्रमाची तरतूद नाही. त्यामुळे बहि:स्थ अभ्यासक्रमाला कुणी न्यायालयामध्ये आव्हान दिल्यास विद्यापीठ अडचणीमध्ये येऊ शकते.