अनधिकृत बांधकामाची महानगरपालिकेत तक्रार केली असून ती मागे घेण्यासाठी १० लाख रुपये खंडणीची द्या, अशी धमकी बांधकाम व्यावसायिकाला दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गिरीश सचदेव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात संगीता शहा आणि एका अनोळखी तरुणा विरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान, गिरीश यांनी केलेलं बांधकामविषयी महानगरपालिकेने नोटीसा बजावल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गिरीश सचदेव यांनी त्यांचं जून घर पाडून तिथे नव्याने घर बांधलं आहे. मात्र, त्यांनी यासाठी कोणतीच परवानगी घेतली नाही. बांधकाम झाल्यानंतर त्यांना आरोपी संगीता यांनी फोनद्वारे तुम्ही अनाधिकृत बांधकाम केलं असून याची तक्रार महानगरपालिकेत दिली आहे. ती मागे घेण्यासाठी १० लाख रुपये खंडणी द्या, अशी धमकी दिली. त्यानंतर एका तरूणाने त्यांना रस्त्यात गाठत आरोपी संगीताला पैसे देऊन विषय संपवून टाक नाहीतर तुमचं काही खरं नाही, अशी देखील धमकी दिली. घाबरलेल्या गिरीश यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.

दरम्यान, गिरीश यांनी बांधकाम करताना परवाना घेतला नव्हता, तसेच त्यांना महानगरपालिकेने नोटीसा बजावल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे आता पालिकेकडून काय कारवाई होते हे पाहावे लागणार आहे. तसेच संबंधित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.