कोरडय़ा हवामानामुळे उन्हाचा चटका कायम

पुणे : राज्यातील कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे उन्हाचा चटका कायम असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा अद्यापही चाळिशीच्या आसपास आहे. पुढील काही दिवसांनंतर ढगाळ हवामान राहणार आहे. मात्र, एप्रिलच्या अखेपर्यंत तापमानातील वाढ कायम राहणार असल्याची शक्यता आहे. १० आणि ११ एप्रिलला विदर्भासह, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या आठवडय़ाच्या सुरुवातीपासून प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेची स्थिती होती. त्यामुळे तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ नोंदविली गेली. तीन ते चार दिवसांत तापमानात किंचित चढ-उतार सुरू होता. मात्र, त्यानंतर तापमानात पुन्हा वाढ नोंदविण्यात येत आहे. सद्य:स्थि तीत राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. राज्यातील निरभ्र आकाशाची स्थिती आणि कोरडय़ा हवामानामुळे प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडय़ातील तापमानात वाढ आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या भागात सरासरीच्या तुलनेत ३.१ ते ५.० अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे.

चंद्रपूर येथे सोमवारी राज्यातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्या पाठोपाठ अकोल्यात ४३.७ अंश, तर अमरावती आणि मध्य महाराष्ट्रातील मालेगाव येथे ४३.२ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाडय़ात सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा ४१ अंशांच्या आसपास आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर, जळगाव, नगर या भागात ४२ अंशांवर तापमान आहे. पुण्याचा पारा पुन्हा ४० अंशांवर पोहोचला आहे. कोकण विभागातील मुंबई, सांताक्रुझ, रत्नागिरी आदी भागातही तापमानात काही प्रमाणात वाढ होत ते सरासरीपेक्षा अधिक झाले आहे. कोकण विभागात यापुढे सरासरीच्या तुलनेत १ ते ३ अंशांपर्यंत, तर राज्याच्या घाट क्षेत्रांमध्ये ३ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई ३३.०, सांताक्रूझ ३३.५, अलिबाग ३१.०,रत्नागिरी ३४.०, पुणे ४०.०, नगर ४२.६, जळगाव ४२.४, कोल्हापूर ३९.५,महाबळेश्वर ३४.९,मालेगाव ४३.२,नाशिक ३८.४,सांगली ४०.४, सातारा ३९.५,सोलापूर ४२.०, उस्मानाबाद ४१.२, औरंगाबाद ४०.७,परभणी ४२.५,नांदेड ४१.५,बीड ४१.९, अकोला ४३.७,अमरावती आणि ब्रह्मपुरी प्रत्येकी ४३.२,गोंदिया ४१.०, नागपूर ४१.८,वर्धा ४२.५, यवतमाळ ४१.५