गेल्या वर्षभरात ‘व्हीआयपीं’चे १७१५ दौरे

पुणे : मुंबई खालोखाल महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असलेल्या पुण्यात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा (व्हीआयपी) राबता वाढला आहे. अतिमहत्त्वांच्या व्यक्तींच्या दौऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून सन २०१७ मध्ये १०८६ तर २०१८ मध्ये शहरात १७१५ ‘व्हीआयपी’ दौरे पार पडले. यात देशपातळीवरील वरिष्ठ राजकीय नेते, परराष्ट्रातील उच्चपदस्थ नेते, अधिकारी आदींचा समावेश आहे.

अतिमहत्त्वाची व्यक्ती शहरात आल्यानंतर त्यांच्या दौऱ्याला सरकारी भाषेत ‘व्हीआयपी दौरा’ असे म्हटले जाते. पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, राज्य पातळीवर मंत्री आदींनी गेल्या वर्षी पुणे शहरात भेट दिली. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, वेंकय्या नायडू, नितीन गडकरी, अमित शहा आदींसह देशपातळीवर अनेक राजकीय व्यक्तींनी शहरात दौरा केला. परदेशातील नेतेही पुणे भेटीवर आले होते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याची सूचना केंद्रीय तसेच राज्य पातळीवर माहिती सूचना कार्यालयातून पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्याचे नियोजन करण्यात येते. या दौऱ्यांच्या ताण पोलिसांवर पडतो.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या दौऱ्याचे नियोजन पोलिसांना करावे लागते. त्यासाठी खास बंदोबस्त ठेवावा लागतो. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्ताची जबाबदारी पुणे पोलीस दलातील विशेष सुरक्षा पथकाकडे (एसपीयू) असते. विशेष सुरक्षा पथकाबरोबरच वाहतूक शाखेतील पोलीस, बॉम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस) नियोजनात सहभागी असते.

विमानतळापासून कार्यक्रम स्थळापर्यंत वाहतुकीचे नियोजन करण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचा दौरा निर्विघ्न पार पडावा म्हणून पोलिसांना खास तयारी करावी लागते. ज्या मार्गाने त्या व्यक्ती जाणार आहेत, त्या मार्गाची पाहणी करावी  लागते. त्याबरोबरच शहर तसेच राज्यपातळीवर आंदोलन, बदलती राजकीय परिस्थिती विचारात घेऊन नियोजन करावे लागते.

पुणे शहरात अनेक महत्त्वाच्या संस्था आहेत. या संस्थांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमास अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, राजकीय नेते उपस्थिती लावतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा वावर वाढला आहे. या दौऱ्यांमुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडत असला, तरी प्रत्येक दौरा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांना नियोजन करावे लागते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या चार वर्षांत शहरात अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच राज्य आणि देश पातळीवरील राजकीय नेत्यांचा राबता वाढला आहे. २०१८ मध्ये या दौऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या वर्षांत १७१५ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी शहराला भेट दिली.

– डॉ. के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे

पुण्यात झालेले ‘व्हीआयपीं’चे दौरे

वर्ष    एकुण दौरे

२०१४  ४४५

२०१५  ६०५

२०१६  ६४८

२०१७  १०८६

२०१८ १७१५