सांगवीतील कैलास तौर या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. कैलास तौरची हत्या झाल्याचे उघड झाले असून कैलासकडे काम करणाऱ्या कामगारानेच त्याची हत्या केली. पत्नीवर बळजबरी केल्याने ही हत्या केल्याची कबुली त्याने दिली.

नवी सांगवीत राहणाऱ्या कैलास तौर (वय ३४) या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी त्याच्या राहत्या घरी आढळला होता. बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह पडला होता. या प्रकरणी पोलिसांनी नऊ तासांत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी कैलासकडे काम करणाऱ्या बिट्टू उर्फ जसवंतसिंह सतीश वर्मा या कामगाराला अटक केली.

कैलासचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. तिथे बिट्टू उर्फ जसवंतसिंह सतीश वर्मा हा दोन महिन्यांपासून काम करायचा. कैलास तौरने दोन दिवसांपूर्वी पत्नीला कार्यक्रमानिमित्त मूळ गावी सोडले होते. घरी एकटा असल्याने त्याने बिट्टूच्या पत्नीला रात्री घरी येऊन स्वयंपाक बनवण्यास सांगितले. परंतु बिट्टूच्या पत्नीने जेवणाचा डबा करून पतीकडे देईन, असे उत्तर दिले. कैलासने बिट्टूला आणि त्याच्या पत्नीला छोट्या मुलीसह नवी सांगवी येथील घरी येण्यास सांगितले. रविवारी रात्री स्वयंपाक करून जेवण झाले. दोघांची बिअरची पार्टी झाली. बिट्टू आणि  कैलास तौर हे खाली जमिनीवर झोपले होते. तर बिट्टूची पत्नी आणि छोटी मुलगी पलंगावर झोपली होती.

यादरम्यान कैलासने बिट्टूच्या पत्नीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. तिने विरोध करत आरडाओरडा केला. यामुळे बिट्टूला जाग आली. त्याच्यात आणि कैलासमध्ये वाद झाला. या वादात बिट्टूने कैलासचे डोकं बाथरूममधील भिंतीवर जोरात आदळले. यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर बिट्टूने पत्नी आणि मुलीसह तिथून पळ काढला. पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांच्या पथकाने बिट्टूला अटक केली.