फेसबुकवर ओळख झाल्यानंतर एका ज्येष्ठ महिलेला विवाहाचे आमिष दाखवून भामटय़ाने ९४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भामटय़ाविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हर्ले बेन्सन असे भामटय़ाचे नाव आहे. मॉडेल कॉलनी भागात राहणाऱ्या एका ६४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. सन २०१४ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांची विवाहित मुलगी परदेशात स्थायिक झाली आहे. मे महिन्यात बेन्सन नाव सांगणाऱ्या एका भामटय़ाने त्यांना फेसबुकवर मैत्रीची विनंती पाठविली. तक्रारदार महिलेने त्याची मैत्रीची विनंती स्वीकारली. फेसबुकच्या माध्यमातून त्यांचा संवाद वाढला. त्यानंतर त्यांनी एकमेकांना मोबाइल क्रमांक दिले. बेन्सनने लंडनमध्ये अभियंता असल्याची बतावणी केली होती.

व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून दोघांचा संपर्क  वाढल्यानंतर त्याने महिलेला विवाहाचा प्रस्ताव पाठविला. महिलेने या संदर्भात कु टुंबीयांचे मत जाणून घ्यावे लागेल, असे त्याला सांगितले. मे महिन्यात बेन्सनने महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (कस्टम) बॅग पकडली आहे. कस्टमकडून बॅग घेण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील. बॅगेत हिरेजडित दागिने, सोन्याचे दागिने आणि ९५ हजार ब्रिटिश पौंड आहेत, असे बेन्सनने महिलेला सांगितले.

महिलेला तातडीने पैसे भरण्याची सूचना त्याने दिली. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची बतावणी करून त्याने जवळपास ५० बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगितले. जुलै महिन्यापर्यंत महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांवर ९४ लाख रुपये भरले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) उदय शिंगाडे तपास करत आहेत.