आरोग्यसेवेचे अनारोग्य

पुणे : महापालिकेची रुग्णालये आणि दवाखाने केवळ नावालाच असल्याची वस्तुस्थिती आहे. दवाखाने आणि रुग्णालयांचे सक्षमीकरण करण्यासाठी एका बाजूला लाखो रुपये खर्च केले जात आहेत. मात्र महापालिकेच्या एकाही रुग्णालयात अतिदक्षता विभाग, रक्तपेढी, रक्त साठवण्याचे केंद्र गेल्या कित्येक वर्षांत महापालिका आरोग्य विभागाला उभारता आलेले नाही. कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. दहा वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूची साथ आल्यानंतर कमला नेहरू रुग्णालयात प्राणवायू यंत्रणा उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले मात्र करोनाच्या ऐन संसर्गाच्या कालावधीत ही यंत्रणाच बंद असल्याचे पुढे आले आहे. सध्या करोनाच्या प्रसारामुळे महापालिकेकडून खासगी रुग्णालये ताब्यात घेतली जात आहेत.

त्याचप्रमाणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मध्यवर्ती प्राणवायू पुरवठा केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत . मात्र आपल्याच रुग्णालयातील करोनाच्या रुग्णांवर उपचाराच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी अशी सुविधा केवळ दुर्लक्षामुळे बंद पडली आहे.

कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये २०१० मध्ये सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून मध्यवर्ती ऑक्सिजन सुविधा तयार करण्यात आली.

दहा वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली होती. रुग्णालयातील १७ वॉर्ड्समधील सुमारे ३५० खाटांना वाहिनीद्वारे प्राणवायू उपलब्ध करून देण्यात येणार होता. त्यासाठी मोठय़ा क्षमतेचे ऑक्सिजन कोठार या सुविधेद्वारे निर्माण करण्यात आले होते. किमान ७ ते १५ दिवस सलग प्राणवायू पुरवण्याची क्षमता या यंत्रणेत होती. सध्या ही सुविधा खासगी संस्थांच्या सहभागाने सुरू असलेल्या फक्त दोन युनिटपुरती सुरू असल्याचे पुढे आले आहे. अन्य वॉर्डमधील खाटांसाठी असली सुविधा पूर्ण बंद आहे.

संपूर्ण यंत्रणा एकूण ७५० खाटांसाठी उपयोगात येणार होती. ही सुविधा सुरू असती तर करोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळातच अत्यंत उपयोगी ठरू शकली असती.

सुविधा का बंद पडली, अपव्यय झालेल्या कररूपी पशांची जबाबदारी कोणाची अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे.

तत्कालीन आयुक्त महेश झगडे यांनी तातडीच्या प्रसंगी उपयोगात येणाऱ्या आधुनिक खाटांसारख्या आरोग्य सुविधा महापालिकेच्या विविध रुग्णालयात निर्माण करण्यासाठी सुमारे ९८ कोटी रुपयांची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर याच कमला नेहरू रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी २०१२ मध्ये आणखी सुमारे ५२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. याशिवाय उपकरणांवर करण्यात आलेला खर्च हा वेगळाच आह. सद्यस्थितीत यातील अनेक उपकरणे बंद अवस्थेत असल्याची वस्तुस्थिती आहे.  कमला नेहरू रुग्णालयातील अनेक विभाग हे खासगी संस्थांना चालविण्यास देण्यात आलेले आहेत. मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अशी ओळख असलेले महापालिकेचे रुग्णालय सर्वसाधारण रुग्णालय ठरले आहे.

रुग्णालये बंदच

सोनावणे रुग्णालयतील नवजात बालकांसाठीचा विभाग कर्मचाऱ्यांअभावी बंद पडतो. राजीव गांधी रुग्णालयातील काही मजले बंदच आहेत, तर दंत रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात आले आहे. कोथरूड येथील िबदू माधव ठाकरे रुग्णालय बंदच आहे.