आपल्या न्याय हक्कांसाठी लढा देणाऱ्या पुण्यातील मूकबधिर तरुणांच्या मोर्चावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला असून ही निषेधार्ह बाब आहे. राज्यातील हे फडणवीस सरकार नसून जनरल डायर सरकार आहे. अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

सुळे म्हणाल्या, मागील साडेचार वर्षात केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने प्रत्येक आंदोलन चिरडून टाकले आहे. या लोकशाहीमध्ये आपल्या मागण्यांसाठी प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा हक्कही या सरकारने हिरावून घेतला आहे. जर या सरकारने पुढील चोवीस तासात निर्णय न घेतल्यास या तरुणांसमवेत मी उपोषणला बसेन असा इशाराही त्यांनी दिला.

पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयापासून मुंबईपर्यंत मूकबधिर तरुण मोर्चा काढणार होते. मात्र, त्या दरम्यान पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज देखील केला. या लाठीचार्जमध्ये तब्बल १२ तरुण जखमी असून त्यातील काही जणांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आंदोलनास तब्बल सहा तास झाले असून आंदोलनकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ज्यांना तरुणांना आवाज नाही त्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार केला आहे. जगामध्ये कधी अशी घटना घडली नसेल अशी घटना आपल्या देशात आज घडली आहे. याचे दुर्देव वाटत असून हे सरकार प्रचाराला हेलिकॉप्टर वापरते. पण एखादा मंत्री या ठिकाणी येऊन तातडीने प्रश्न सोडवित नाही. ही निषेधार्थ बाब असून लाठीचार्ज केलेल्या पोलिसांची मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक पणे चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तर अजून या तरुणांनी जेवण केले नाही. पण मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर जेवण करणार यातून या सरकारची मानसिकता दिसते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.