जागतिक दर्जाचे स्थानक होण्याच्या यादीत असलेले व केवळ स्वच्छतेसाठी वर्षांला सुमारे सहा कोटी रुपये खर्च करणारे पुणे रेल्वे स्थानक रेल्वे मंत्रालयाने स्वच्छतेच्या परीक्षेत सपशेल नापास ठरविले आहे. ए-वन गटातील स्वच्छ स्थानकाच्या यादीमध्ये पुणे स्थानकाला शेवटून पहिला म्हणजेच पंचाहत्तरावा क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे या यादीत पुणे स्थानक सर्वाधिक अस्वच्छ स्थानक ठरविले गेले आहे. हा निकाल आल्यानंतर वरिष्ठांनी संबंधित अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. स्थानकातील स्वच्छतेकडे मागील काही दिवसांत प्राधान्याने लक्ष घालण्यात आले असले, तरी काही प्रमाणात होणाऱ्या बेजबाबदारपणाबाबत प्रशासनाबरोबरच प्रवाशांनाही जबाबदार धरण्यात येत आहे.
पुणे स्थानकावरील ताण दिवसेंदिवस वाढतो आहे. सुमारे साडेतीन लाख प्रवासी व पावणेदोनशे गाडय़ांची स्थानकात ये-जा असते. प्रवाशांना विविध सेवा-सुविधा देण्याबरोबरच स्थानकातील स्वच्छतेवर सर्वाधिक भर देऊन काम केले जात असल्याने पुणे स्थानकाच्या प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येत होते. स्वच्छतेच्या कामासाठी वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांचा सहभागही घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे वार्षिक साडेपाच कोटींची निविदा काढून स्वच्छतेचे काम देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांवरील इतर खर्च धरता केवळ स्वच्छतेसाठी वर्षांला सहा कोटींहून अधिक रक्कम खर्च केली जात आहे. स्वच्छतेच्या कामावर प्रत्यक्ष व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात येते.
स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना व मोठय़ा प्रमाणावर पैसे खर्च होत असतानाही रेल्वे मंत्रालयाच्या स्वच्छतेच्या परीक्षेत स्थानक नापास झाले आहे. पुणे स्थानकाला पंचाहत्तरावा क्रमांक देण्यात आला आहे. याच यादीत सोलापूर स्थानक चौथ्या क्रमांकावर, तर दादर व कल्याण स्थानके अनुक्रमे सत्तावीस व तिसाव्या क्रमांकावर आहेत. रेल्वे मंत्रालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सर्वच जबाबदार अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. त्यामुळे सकाळपासूनच सर्व फलाट, रेल्वे मार्गाच्या स्वच्छतेचे काम करण्यात आले. त्यामुळे स्थानकात अभूतपूर्व स्वच्छता दिसून येत होती. या निकालाबाबत अनेकांकडून आश्चर्यही व्यक्त करण्यात आले.
स्थानकात अस्वच्छता कशामुळे?
पुणे रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांखेरीज अनेकांची ये-जा असते. विशेष म्हणजे स्थानकाचा परिसर काही मंडळींसाठी घरच आहे. स्थानकावर रात्री झोपण्यासाठी अनेक लोक येत असतात. त्यात भिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्या पाठोपाठ बाहेरगावहून काही दिवसांकरिता पुण्यात आलेली मंडळी व जवळच असलेल्या ससून रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातलगांचाही समावेश असतो. ही मंडळी रात्री स्थानकात झोपतात व सकाळी फलाटावर उभ्या असलेल्या गाडय़ांमधील स्वच्छतागृहांचा वापर करतात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर घाण होते. अनेक मंडळींचे कपडे व अख्खा संसारच स्थानकाच्या आवारात आहे. या मंडळीवर कुणीही कारवाई करीत नाही. त्याचप्रमाणे स्थानकालगत असलेल्या खाद्यपदार्थाच्या दुकानांतून प्रवासी मोठय़ा प्रमाणावर खाद्यपदार्थ व पाण्याच्या बाटल्या स्थानकात घेऊन येतात. त्याचा कचरा अनेक जण स्थानकाच्या आवारातच फेकतात. पान व गुटखा खाऊन स्थानकाच्या आवारात पिचकाऱ्या मारणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अनधिकृतपणे खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचाही अस्वच्छता पसरविण्यात मोठा वाट असल्याचे दिसून येते.

‘‘रेल्वे मंत्रालयाने पुणे स्थानकाला स्वच्छतेत नापास करून घरचा आहेर दिला आहे. अस्वच्छतेला प्रशासनासह प्रवासीही जबाबदार आहेत. अनेक जण बाहेरच्या खाद्यपदार्थाचा कचरा स्थानकात आणून टाकतात. मॉल, विमानतळ आदी ठिकाणी आपण घाण करीत नाही, तर रेल्वे स्थानकातच अस्वच्छता का करता. याबाबत प्रवाशांना मार्गदर्शन देण्याबरोबरच कठोर दंडाची कारवाई गरजेचे आहे. भिकारी, अनधिकृत फेरीवाल्यांसह अनेक मंडळींचे रेल्वे स्थानक घर झाले आहे. काहींचा संसारच स्थानकावर आहे. त्यांना प्राधान्याने बाहेर काढण्याबरोबरच त्यांना स्थानकात घेणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. केवळ प्रवाशांनाच स्थानकात प्रवेश दिला पाहिजे. याबाबत ठोस उपाययोजना झाल्याशिवाय स्थानक स्वच्छ होणार नाही.’’
– हर्षां शहा
अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप