शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. छोटे व्यावयायिक, फेरीवाल्यांशी ओळख करून घेत त्यांच्या ओळखीतून बनावट नोटा चलनात आणल्या जात आहेत. बनावट नोटांचे मूळ पश्चिम बंगालमधील मालदा जिल्हा असून बांगलादेशाला लागून असलेल्या या जिल्ह्य़ातून देशभरात बनावट नोटा वितरित केल्या जातात.
पुणे जिल्ह्य़ातील आठवडी बाजारात आणि शहरात बनावट नोटा चलनात आणल्या जातात. किरकोळ खरेदी करून त्या बदल्यात पाचशे आणि एक हजारांच्या बनावट नोटा वटवल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि पिंपरी शहरात बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय आहे. विशेषत: पश्चिम बंगालमधील परप्रांतीय मजुरांना हाताशी धरून बनावट नोटा चलनात आणल्या जात आहेत.
बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी नुकतीच अटक केली. पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांनी या बनावट नोटा पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्य़ातून आणल्याची कबुली दिली आहे. पिंपरीतील पवनेश्वर मंदिराजवळ कापसे चाळीत राहणारा शमशुद्दीन रहमान शेख (वय ३०) हा ज्यूस सेंटर चालविणारा आरोपी ग्रामीण भागातील आठवडी बाजारात जाऊन खरेदी करण्याच्या बहाण्याने बनावट नोटा वटवित असल्याची माहिती पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई ए. बी. क लांडीकर यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख आणि त्याची सासू जोहरा मन्सुर शेख (वय ५०, रा. भाटनगर, पिंपरी) यांना पकडले होते. त्यांच्याकडून एक हजारांच्या ६१ आणि पाचशे रुपयांच्या दोन बनावट नोटा अशा जप्त करण्यात आल्या, तसेच शंभर रुपयांच्या २३ चलनी नोटा जप्त करण्यात आल्या होत्या, अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली.
आरोपी शमशुद्दीन आणि त्याची सासू जोहरा हे मूळचे पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्य़ातील आहे. सासू जोहरा हिने काही दिवसांपूर्वी मालदामधून बनावट नोटा आणल्या, अशी कबुली शमशुद्दीन याने पोलिसांना दिली. जोहरा हिची पोलिसांनी चौकशी केली. मालदामधील एका ओळखीच्या व्यक्तीने बनावट नोटा दिल्याचे जोहरा हिने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक आयुक्त मोहन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक मुगळीकर यांनी सांगितले.

अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा डाव
पश्चिम बंगालमधील मालदा जिल्हा हा बांगलादेशानजीक आहे. बांगलादेशाच्या सीमेला अनेक ठिकाणी कुंपण नाही. बांगलादेशातून बनावट नोटा मालदा येथे पाठविल्या जातात. तेथून या नोटा देशभरात वितरित केल्या जातात. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेमार्फत बनावट नोटा भारतात पाठविल्या जातात. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा डाव यामागे आहे. यापूर्वी पुणे शहरात बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत. या नोटा चलनात आणणारे बहुतांश आरोपी पश्चिम बंगालमधील आहेत. पिंपरीत पकडण्यात आलेल्या बनावट नोटांची पाहणी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी केली. या नोटा वितरित करणाऱ्या मूळ आरोपींचा माग काढणे तितकेसे सोपे नाही. सीमेपलीकडून या नोटा वितरित केल्या जातात. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला देखील मर्यादा येतात. बनावट नोटा नीट हाताळल्या तर त्यातील उणिवा त्वरित लक्षात येतात. बनावट नोटांचा कागद देखील पातळ असतो.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा