बनावट नोटा बाजारात आणणारी सात जणांची टोळी पिंपरी पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून एक हजार व पाचशे रुपयांच्या सात लाख तीस हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.  
महंमद सनवर हुसेन (वय २५), सेरतअली जलाउदीन शेख (वय २६), मोहमंद अबुकलाम मोहमंद मुजीबर शेख (वय २६), सुलेमान इस्ताबअली शेख (वय १९), मोहमद युसुफअली इसारादिन अली (वय २१), हजरत अली हदेश अली (वय २१), आणि मुबारक मुतीऊर रहमान हुसेन (वय २८, सर्व राहणार दळवीवाडी सिंहगड रोड, नांदेड सिटी फाटा. मु. रा. माळदा जिल्हा, पश्चिम बंगाल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास वल्लभनगर येथील एका वाईन शॉपीमध्ये एक तरुण एक हजार रुपयांची नोट घेऊन आला. त्याने १२० रुपयांची बिअर घेतली आणि उर्वरित रक्कम परत घेऊन गेला. काही वेळाने दुकानाचे मालक संतोश शिरभाते यांनी नोट पाहिली असता ती बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळाने आणखी एक जण त्याच मालिकेतील दुसऱ्या क्रमाकांची नोट घेऊन वाईन शॉपीमध्ये आला. या वेळी मात्र त्या युवकाला दुकानातील कामगारांनी पकडले व पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
 पोलीस तातडीने तेथे पोहोचले. त्यांनी नोट तपासून महंमद हुसेन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आरोपी राहात असलेल्या दळवीवाडी येथे पोहोचले. तेथून त्यांनी इतरांना ताब्यात घेतले. आरोपी हे तेथे भाडय़ाने खोली घेऊन राहात होते. त्यांच्या खोलीची झडती घेतली असता पोलिसांना त्या ठिकाणी हजार व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या.