कामे न झाल्याची मुख्यमंत्र्यांची कबुली; महापालिकेकडून सविस्तर अहवाल मागविला

पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेचे पितळ गेल्या दोन, तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उघड झाले आहे. शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे नालेसफाईअभावी रस्त्यांवर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार घडले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पावसाळ्याच्या तोंडावर शहरात नालेसफाईची कामे पूर्ण झाली नसल्याची कबुली दिली आहे. शहरातील नालेसफाई आणि कचरा वाहतूक गैरव्यवहार या संबंधीचा सविस्तर अहवाल सादर करावा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिला आहे.

शहरातील नालेसफाईची कामे करण्यासाठी महापालिकेने कोटय़वधी रुपयांची तरतूद केली होती. क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून मे महिनाअखेपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले होते. ही कामे पंधरा जूनपर्यंत पूर्ण झालेली नसतानाही कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कागदोपत्री कामे दाखवून कोटय़वधी रुपयांचा निधी हडप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला होता. कामे झालेली नसतानाही ठेकेदारांना बिले देण्यात आल्याचेही चित्र पुढे आले होते.

नालेसफाई कामांच्या गैरव्यवहाराच्या पाश्र्वभूमीवर खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी नालेसफाई आणि कचरा वाहतुकीच्या कामांतील गैरव्यवहाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यावेळी नालेसफाईची कामे पूर्ण झाली नसल्याची कबुली देतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधीचा अहवाल सादर करण्याची सूचना महापालिकेला दिली.

नालेसफाईसाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर निविदा मागविण्यात आल्या होत्या. या कामांची बिले देताना मोजमाप पुस्तकातील नोंदी, ठेकेदाराने केलेल्या कामांची छायाचित्रे, प्रत्यक्ष परिमाणे यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतरच बिले देण्यात आली असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

नालेसफाईच्या कामासाठी राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया, त्याच्या अटी-शर्ती, झालेल्या कामांची पाहणी याचा तपशील मुख्यंमत्र्यांनी महापालिकेकडून मागविला आहे. येत्या आठ दिवसांमध्ये त्याबाबतचा स्पष्ट अहवाल देण्याचा आदेशही महापालिकेला देण्यात आला आहे.

कचरा वाहतूक गैरव्यवहाराची चौकशी

शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करून त्याची कचरा केंद्रापर्यंत वाहतूक करण्यासाठी ठेकेदारांमार्फत वाहन व्यवस्था करण्यात आली होती. या कचरा वाहतुकीसाठीही महापालिकेने अधिक पैसे मोजल्याची तक्रार आहे. या पाश्र्वभूमीवर आमदार भीमराव तापकीर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याबाबत चौकशी करण्यात येईल आणि महापालिकेकडून अहवाल मागविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.