News Flash

नागरिकांच्या जिवाशी खेळ

बनावट इलेक्ट्रिक साहित्य तसेच वायरचा वापर केल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या गंभीर दुर्घटना घडल्या आहेत.

नागरिकांच्या जिवाशी खेळ

 

बनावट इलेक्ट्रिक साहित्याची राजरोस विक्री; तपकीर गल्लीतील  इलेक्ट्रिक बाजारावर पोलिसांची नजर; दोन कोटींच्या वायर जप्त

पुणे : बुधवार पेठेतील तपकीर गल्लीतील इलेक्ट्रिक बाजारातील एका व्यावसायिकाकडून नामांकित कंपनीच्या बनावट वायरची विक्री होत असल्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला. बनावट इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या इलेक्ट्रिक बाजारातील व्यावसायिकांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून आतापर्यंत या कारवाईत पोलिसांनी दोन कोट रुपयांच्या बनावट वायर जप्त केल्या.

बनावट इलेक्ट्रिक साहित्य तसेच वायरचा वापर केल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात साकारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पातील इलेक्ट्रिक कामे बांधकाम व्यावसायिक ठेकेदारांना देतात. ठेकेदार आणि त्यांचे कर्मचारी बुधवार पेठेतील तपकीर गल्ली असलेल्या इलेक्ट्रिक बाजारातून साहित्य खरेदी करतात. इलेक्ट्रिक बाजारातील एक व्यापारी नामांकित कंपनीच्या नावे बनावट वायरची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पवन इलेक्ट्रिकलचे मालक दिनेशसिंग राजपुरोहित यांच्या दुकानावर छापा टाकला. या कारवाईत ४३ लाखांच्या बनावट वायर जप्त करण्यात आल्या. तपासात गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांना इलेक्ट्रिक बाजारातील गैरप्रकारांची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने भगवती इलेक्ट्रिक या दुकानावर छापा टाकला.

भगवती इलेक्ट्रिकल या दुकानातून मोठ्या प्रमाणावर बनावट इलेक्ट्रिक साहित्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या दुकानाचे मालक रमेशकुमार आनंदकुमार सुथार यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुथार यांचे दुकान आणि गोदामावर छापे टाकून दोन कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक निर्मल, संदीप जमदाडे, जयदीप पाटील, महेंद्र पवार, सचिन ढवळे आदींनी ही कारवाई केली.

आयएसआय  परवानेही रद्द

पोलिसांकडून सनफ्लेक्स केबल्स, गोल्ड लाइन एफ आर केबल्स, केपीसी केबल्स, हायफाय इन्सुलेटेड केबल्स, इडीसन केबल्स अशी नावे असणाऱ्या कंपन्याचे इलेक्ट्रिक साहित्य जप्त केले. भारतीय मानक कार्यालयात (आयएसआय) जाऊन पोलिसांनी या कंपन्यांबाबत चौकशी केली. तेव्हा संबंधित उत्पादनांचे परवाने रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे.

परराज्यातून बनावट इलेक्ट्रिक साहित्य

तपकीर गल्लीतील इलेक्ट्रिक बाजारात १५ ते २० व्यावसायिक बनावट इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर पोलिसांनी नजर ठेवली आहे. बनावट इलेक्ट्रिक साहित्य विक्री व्यवसायात अनेक धनाढ्य व्यावसायिक गुंतले आहेत. परराज्यातून बनावट साहित्य विक्रीस येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 12:04 am

Web Title: fake electric material short circuit akp 94
Next Stories
1 पुण्यासह पश्चिाम महाराष्ट्रातील १४ लाख ग्राहकांची वीज तोडणार
2 फडणवीस आज थेट महापालिकेत
3 रस्ते अपघात रोखण्याच्या उपाययोजनांसाठी ‘वेब पोर्टल’
Just Now!
X